पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘पालवी’तर्फे विघ्नहर्ता प्रकल्प

0
नाशिक । सामाजिक जाणिवेतून पर्यावरणाच्या प्रश्नांवर उपाय शोधण्याचे भान विद्यार्थ्यांमध्ये व महाविद्यालयीन जीवनात यावे या हेतूने तसेच गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी पालवी फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विद्यमाने यंदा विघ्नहर्ता प्रकल्प हाती घेणार असल्याची माहिती मंडळाच्या डॉ. सुवर्णा पवार, प्रदूषण नियंत्रणचे प्रादेशिक अधिकारी पाटील यांनी दिली.

या प्रकल्पांतर्गत नाशिकमधील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सजगता निर्माण करण्यासाठी लघुपट प्रदर्शन, निबंध स्पर्धा व पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. पालवी फाऊंडेशनच्या माध्यमातून काही महिला एकत्रित झाल्या व त्यांनी वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रेन वॉटर हार्वेस्टिंग, लहान मुलांसाठी नेत्रतपासणी शिबिर, सर्वरोग निदान शिबिर असे उपक्रम राबवले.

गणेशोत्सवादरम्यान होणरी जलस्त्रोतांची हानी रोखण्यासाठी गतवर्षी पालवी फऊंडेशनने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घरच्या घरी विसर्जित करता याव्यात या उद्देशाने अमोनियम बाय कार्बोनेटच्या पावडरचे वितरण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. या उपक्रमाला नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला होता.

त्यातूनच प्रेरणा घेत यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने पालवी फाऊंडेशनने यंदा विघ्नहर्ता प्रकल्पाची आखणी केली आहे. जनजागृतीसाठी संस्थेने एक लघुपट तयार केला असून नाशिकमधील सर्व शाळा तसेच महाविद्यालयांत हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. तसेच पर्यावरणपूरक वस्तूंपासून मूर्ती तयार कराव्यात व घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यातील प्रत्येक गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे तसेच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पालवी फाऊंडेशनच्या या उपक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी संस्थेच्या स्वाती खंदारे, श्रद्धा गावंडे, दीपाली केळकर, डॉ. राजश्री कुटे, कुंदा भालेराव, स्मिता येलेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*