पेन्शन वाढ व महागाई भत्त्यासाठी विडी कामगारांची निदर्शने

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– पेन्शन कायदा लागू दिनानिमित्त केंद्र सरकारने विडी कामगारांना दरमहा पेन्शन 3 हजार रुपये सुरु करावी व महागाई भत्ता लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक) व नगर विडी कामगार संघटनेच्यावतीने (इंटक) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विडी कामगार महिलांनी निदर्शने केली.

या आंदोलनात कॉ. शंकर न्यालपेल्ली, शंकरराव मंगलारप, कॉ.सुधीर टोकेकर, कारभारी उगले, व्यंकटेश बोगा, कमलाबाई दोंता, शारदा बोगा, लक्ष्मी कोटा, श्यामला म्याकल, इश्‍वरी सुंकी, कविता मच्चा, निर्मला न्यालपेल्ली, बालमणी रोल्ला, शोभा पासकंठी, सरोजनी दिकोंडा, लिलाबाई भारताल आदिंसह विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या. 16 नोव्हेंबर 1995 रोजी पेन्शन कायदा लागू करण्यात आला. हा दिवस पेन्शन कायदा दिन म्हणून पाळला जातो.

सुरुवातीला विडी कामगारांना दरमहा पेन्शन 330 ते 350 रुपये मिळत होती. त्यावेळी सोन्याची किंमत एकग्रॅमला 300 रुपये होती. महागाई दरानुसार एक ग्रॅम सोन्याची किंमत 3 हजार रुपये झाली आहे. त्याप्रमाणे विडी कामगारांना दरमहा पेन्शन 3 हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे. सध्या विडी कामगारांना 700 ते 1 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. देशात 5 लाख, महाराष्ट्रात 50 हजार तर नगर व नाशिक जिल्ह्यात 20 हजार पेन्शनर विडी कामगार आहेत. यामध्ये 90 टक्के महिलांचा समावेश आहे.

हे सर्व विडी कामगार आर्थिक दुर्बल घटकातील असून सेवानिवृत्त विडी कामगारांचे जीवन पेन्शनवर चालत आहे. त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीही सवलत मिळत नाही. विडी कामगारांनी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून विडी कामगारांना महात्मा गांधी आधार योजना म्हणून दरमहा 1 हजार रु. देण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने या मागणीचा विचार केला नाही.

खा.भगतसिंह कोशियरी समितीने शिफारस केल्याप्रमाणे केंद्र सरकारने पेन्शनर विडी कामगारांना व सर्व धंद्यातील कामगारांना दरमहा 3 हजार रुपये त्वरीत सुरु करुन, महागाई भत्ता लागू करण्याची शिफारस केली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी विडी कामगारांनी केली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

*