Video : शेतकऱ्यांची पोरं आहोत, शेती तर करणारच; सुरगाण्यातील युवकांचा निर्धार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अलीकडे तरुणाई देखील शेती (Agriculture) व्यवसायात मोठ्या प्रमाणात उतरत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोग, उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न शेतमालाच्या विक्रीतून न निघणे आणि व्यापाऱ्यांकडून फसवणूक होणे अशा अनेक समस्या या पिढीपुढे आहेत...

तरीही आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत, शेती तर करणारच, अशा उमेदीने सुरगाणा तालुक्यातील तरुण शेतकरी शेतात श्रम घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरगाणा तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले.

काही भागात शेतीचे नुकसान झाले तर काही भागात शेतीला उभारीही मिळाली. तालुक्यातील देवसाने परिसरातील युवा शेतकरी तुकाराम गांगुर्डे याच्यासह परिसरातील चार ते पाच जणांनी आपल्या शेतात साधारण दोन महिन्यांपूर्वी मिरची, फ्लावर, टोमॅटो अशी पिके घेतली आहेत. टोमॅटो पिक अद्याप आले नाही. यामुळे शेतकरी चिंताक्रांत असताना मिरचीचे पिक चांगले आल्याने थोड्या का होईना आशा पल्लवित झाल्या आहेत.

आता मिरची खोडणीसाठी तयार आहे. मिरची पुढे धुळे किंवा नाशिकच्या मार्केटमध्ये विक्रीस जाणार असून मिरचीला चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा तरुण शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मिरचीचे पिक चांगले आले, टोमॅटोने मात्र दगा दिला. टोमॅटो पिक येईल का नाही याबाबत साशंकता आहे. सध्या शेतीचा खर्च वाढत चालला आहे. खर्च वाढला असला तरी समाधानकारक भाव मिळावा, असेच वाटत आहे.

- तुकाराम गांगुर्डे. तरुण शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com