
निफाड | प्रतिनिधी | Niphad
जिल्हा बँकेने (NDCC Bank) सुरू केलेली सक्तीची कर्ज वसुली तत्काळ थांबवावी व शासनाने कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कार्यालयासमोर सहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे...
या काळात एकही शेतकरी आंदोलनस्थळी फिरकला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयावर धडक देत निवेदन दिले. यावेळी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.
शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेचे नियमबाह्य नाव का लावले जाते, असा जाब विचारत अधिकाऱ्यांना घेराव घातला. संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी दिल्याने अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे यांनी आंदोलनाला पाठिंबा देत येत्या ४८ तासांत मागणी मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
यावेळी दत्ता गवळी, अब्दुल शेख, संजय पाटील, उमाकांत शिंदे, नवनाथ गावले, केशव पानगव्हाणे, रामदास आहेर, साहेबराव सुरवाडे, बाळासाहेब सुरवाडे, रामचंद्र आहेर, बाळासाहेब कोल्हे, अण्णासाहेब अनारसे, नारायण आहेर, शिवनाथ परदेशी आदींसह शेतकरी उपस्थित होते.