डाळिंब शेतीला 'त्यांनी' दिला नवा आयाम; पाहा व्हिडीओ...
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा हा शेतीची उत्तम प्रयोगशाळा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात शेतात नवनवीन प्रयोग करून येथील शेतकरी आपली वेगळी ओळख निर्माण करत असतात. कांदा, डाळिंब, द्राक्ष या पिकांसाठी नाशिक जिल्ह्याचे वातावरण पोषक आहे...
म्हणूनच या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय करण्यासही येथे मोठा वाव आहे. द्राक्षांच्या पिकावर प्रक्रिया करून वाईन निर्मिती उद्योग येथे उभा राहू पाहत असला तरी, कांदा आणि डाळिंब या पिकांवरील प्रक्रिया उद्योग पाहिजे तसा उभा राहू शकला नसल्याने येथील नगदी पिकांनाही पारंपारिक पद्धतीच्या मर्यादा ओलांडता आल्या नाहीत हे मात्र सत्य आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील डाळिंब शेतकऱ्यालाही वातावरण आणि बाजारस्थिती यावर आधारित शेती करावी लागत आहे. त्यामुळे या जिल्यातील डाळिंब पिकाची लागवड आणि उत्पादन कमी होऊ लागले, हे आरीष्ट्य शेतकऱ्यावर ओढवले आहे.
मात्र बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गावातील उपक्रमशील शेतकरी दगाजी सोनावणे यांनी डाळिंब शेतीला नवा आयाम दिला आहे. त्यांनी डाळिंबाच्या शेतीविषयी वेगळा दृष्टीकोन जपत आपल्या शेतात डाळिंबाच्या झाडावर फळांचे उत्पन्न न घेता त्या झाडांवर रोपांचे उत्पन्न घेतले आहे.
त्यांनी आपल्या शेतात भव्य अशी डाळिंब रोपवाटिका निर्माण केली आहे. त्यांच्या या कामाला शासनानेही हातभार लावला असून, त्यांची रोपवाटिका ही शासनमान्य रोपवाटिका म्हणून काम करते आहे.
सोनवणे यांनी त्यांच्या शेतात साधारण पंधराशे मोठी झाडे लाऊन त्यांच्यावर ते रोपांची निर्मिती करतात. त्यांची रोपे ही आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर गुजरात आणि राजस्थान मध्येही वितरीत होतात.
सोनवणे यांनी हा प्रकल्प सुमारे पंधरा वर्षापासून यशस्वीरीत्या चालविला आहे. त्यांची दुसरी पिढीही याच व्यवसायात उतरली आहे. अशा पद्धतीने दगाजी सोनावणे यांनी शेतीतील नवा प्रयोग शोधत विकासाची वाट निश्चित केली असल्याने त्यांचा प्रवास शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.