Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

नाशिक | अनिरुद्ध जोशी | Nashik

शहरांचा विकास गरजेचा आहेच मात्र विकासासाठी केवळ शहरच असते हा समज सुरगाणा तालुक्यातील एका युवकाने मोडीत काढला आहे. एका आदिवासी युवकाने 'रानझोपडी' अशी संकल्पना उभारून यंत्रांच्या दुनियेशी मैत्री करण्याऐवजी निसर्गाशी मैत्रीचे नाते जोपासले आहे.

गारमाळ येथील हर्षद थविल नामक युवकाने केलेला प्रयोग लक्षवेधी ठरत आहे. अभियांत्रिकी शिक्षणानंतरही गावाची-मातीची ओढ आणि शेतीमधील आवड यामुळे येथे हर्षदने नवी संकल्पना राबविली. कृषी पर्यटनापेक्षाही दुर्मिळ वृक्ष प्रजातींचे संरक्षण व संवर्धन हा मुख्य हेतू आहे. यातूनच रानझोपडीचा प्रवास सुरू झाला आहे.

दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व संरक्षण

बालपणापासून शेती-मातीत रमणाऱ्या हर्षदला डोळ्यांदेखत नष्ट होणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती, आदिवासी दुर्गम भागातील झाडे टिकविण्याची चिंता वाटे. याच मानसिकतेतून त्याने या दुर्मिळ कलमांची लागवडही 'रानझोपडी'च्या आसपास केली आहे. याशिवाय 'कॉफी', 'कोको', 'लिची', 'मंगोस्टोन', 'स्टार फ्रूट' आदी विदेशी वृक्षांच्या प्रजातींचीदेखील लागवड त्याने या परिसरात केली आहे.

अभियंत्यासोबत उत्तम वारली चित्रकार

हर्षद हा अभियंता असण्यासोबतच उत्तम वारली चित्रकारदेखील आहे. सध्या सर्वत्र प्रचलित असणाऱ्या वारली चित्रकलेच्या संकल्पनेवर राज्यातील इतर आदिवासीबहुल भागांचा प्रभाव विशेषत: दिसून येतो. मात्र, सुरगाण्याची वारली चित्रशैली काहीशी भिन्न असल्याचे त्याचे निरीक्षण आहे. त्याच्या निरीक्षणातून उदयाला येणारी अनोखी वारली चित्रेदेखील रानझोपडीचा अविभाज्य भाग झाली आहेत.

रुचकर जेवण

रानझोपडीत येणाऱ्या पर्यटकांना जेवणही रानझोपडी सारखेच रुचकर मिळते. येथे मसालेयुक्त जेवण मिळत नसले तरी आदिवासींचे चविष्ठ जेवण येथे मिळते. रानझोपडीचा पाहुणचार घेणाऱ्या पाहुण्यांच्या पारंपरिक आदिवासी अगत्य व खानपान पद्धतीतून केल्या जाणाऱ्या सरबराईमुळे अनेक जण 'रानझोपडी'तील वास्तव्याला आता पसंती देऊ लागले आहेत.

चहाचेही अनेक प्रकार

जंगली तुळस (काळी तुळस), कॉफी, बासमती चहा, अवाकाडो, सिडलेस लिंबू यांसह अनेक चहा उपलब्ध.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com