Video आदिवासी समाजात काठी (होळी)चे महत्व

jalgaon-digital
2 Min Read

राकेश कलाल

नंदुरबार – Nandurbar

आदिवासी समाजात होळी सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा सण एक किंवा अनेक गावे एकत्र येवून साजरा केला जातो. सामुहिक वाद्य वाजवून नाच करणे म्हणजे खर्‍या अर्थाने सामुहिकता व समानता जपणे हे यामागचे वैशिष्टय आहे.

या सणात स्त्री पुरुष एकत्र येवून आनंदाने नाचतात. या वैशिष्टयपूर्ण जीवनपद्धतीमुळे समाजातील व्यक्तीवर आलेले दुःख व संकटांचा विसर पडत असतो.

अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील होळीला फार महत्व आहे. नर्मदा व तापी या दोन्ही नद्यांच्या मध्ये सातपूडा पर्वताच्या चौथ्या रांगेत ऐतिहासिक वारसा लाभलेले काठी गांव आहे. काठी संस्थान हे पाडवी घराण्याचे आहे. काठी गावाच्या होळीला रजवाडी होळीचा दर्जा आहे. काठी संस्थानिकाच्या कागदोपत्री नोंद १२४६ पासून आहे. बाराव्या शतकातील राजे उमेदसिंग यांच्या कारकीर्दीपासुन या होळीला सुरूवात झाली. १२४६ पासुन संस्थान बरखास्त होईपर्यत सोळा राजे होवून गेले. या संस्थांनचे राजे मानसिंग पाडवी हे शेवटचे राजे होते. त्यांचे वारस आजही काठी येथे दसरा व होळी उत्सव मोठ्या जल्लोशात साजरा करतात व आदर्श आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी संस्कृती नुसार आचरण करतात.  काठी येथे होळीच्या पाचदिवस अगोदर मानता करून काठी गावातील होळीचे सेवेकरी सातपुडयातील जंगलात गुजरात राज्यातील डेडियापाडा येथून होळीच्या दांडा आणतात.

काठी येथील होळीचा खड्डा सामुहीकपणे खोदण्याची प्रथा आहे. यासाठी प्रत्येक जण होळीच्या ठिकाणी जावून मुठभर माती काढतो. त्यातूनच होळीचा दांडा उभारण्यासाठी खड्डा तयार करण्यात  येतो. पहाटे ५ वाजेपर्यंत सुमारे ९० फुट उंचीचा बांबूचा दांडा त्या खड्डयात उभारण्यात येतो. होळी पेटविण्यापुर्वी विधीवत पुजा करण्यात येते. पानाफुलांनी सजवलेला बांबू खड्डयात उभा करण्यात येतो. आजुबाजूने लाकडाच्या ओंडक्यांचा आधार देण्यात येतो. त्यानंतर आदिवासी बांधव होळीभोवती फेर धरून पारंपारीक नृत्य करतात. नृत्य करणार्‍या आदिवासी बांधवांच्या हातात धार्‍या, तिरकामटे, कुर्‍हाड, बर्ची तसेच विविध प्राण्यांचे मुखवटे लावण्यात येतात. हातामध्ये ढोल, पिपरी, पावरी,बासरी आदी वाद्यांनी परिसर दुमदुमून जातो. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पुढारी, नेते, अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकारांनी मोठया संख्येने हजेरी लावून काठी येथील होळीचा मनमुराद आनंद लुटतात. रात्रभर नृत्य करुन पहाटे ५ वाजता सदर होळी पेटविली जाते.

मात्र, यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे होळी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मात्र, आदिवासी बांधवांमध्ये उत्साह कायम आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *