Video : नाशिकला आला यंदाचा पहिला पूर; दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने गुरुवारपासून जोरदार हजेरी लावल्याने अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर धरणातून दुपारी एक वाजता ५०० क्युसेसने विसर्ग सुरु होता. दुपारी ४ वाजता २०८० क्युसेसने विसर्ग तर सायंकाळी ६ वाजता १९९४ ने क्युसेस वाढवून एकूण ४०७४ क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे...
तसेच नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पुराची ओळख समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागले आहे. यंदाचा पहिला पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
दरम्यान, नांदूरमध्यमेश्वर धरणातून एकूण 1614 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कडवा धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून पावसाचा जोर असल्याने कडवा धरणातून दुपारी 2 वाजता 848 Cuses ने कडवा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे.
पुणेगावमधून 590 क्यूसेस तर दारणातून 1400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून टप्याटप्याने विसर्ग वाढवण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात दि. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी रेड अलर्ट असून जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा इगतपुरीच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राने दिला आहे. दि. १० ते १३ सप्टेंबर दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.