Video : १२ महिने विहिरी कोरड्या, टँकरनेच भागते तहान; येवल्यातील 'हा' भाग अजूनही पाण्यापासून वंचित
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ऑगस्ट महिन्याचे १५ दिवस उलटूनही नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत सरासरीच्या तुलनेत अवघ्या ३९.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लगत असून येवल्यातील नगरसूल भागातील गणेशनगर येथील पाणीटंचाईची विदारक परिस्थिती समोर आली आहे.
दैनिक देशदूतच्या टीमने येवला तालुक्यातील गणेशनगर येथील वस्तीवर भेट दिली. भर पावसाळ्यातदेखील परिसरात सध्या २२ टँकर सुरु असून पाण्याअभावी आणखी पाच टँकर मागविण्यात आल्याचे समोर आले. येवला तालुक्यातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे.
गणेशनगर वस्तीवर सुमारे १० ते १२ घरे आहेत. येथे सलग दोन वर्ष कमी प्रमाणात पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीबाणी झाली आहे. परिसरातील विहिरी कोरड्या होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे दर तीन दिवसाला या वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
वस्तीच्या बाहेर प्रत्येक कुटुंबाने आपापले पाण्याचे ड्रम ठेवले असून त्यात टँकरचे पाणी टाकले जाते. त्यानंतर छोट्या भांड्यांच्या सहाय्याने ड्रममधील पाणी आपापल्या घरात नेऊन साठवण केली जाते. पाण्याचा एक थेंबदेखील वाया जाऊ नये, यासाठी येथील नागरिक झटत आहेत.
दिवसभरात कधीही टँकर येत असल्याने येथील नागरिकांना आपला उदरनिर्वाह सोडून पाणी भरावे लागते. यामुळे येथील नागरिकांचे दिनचक्र पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहे. वर्षानुवर्षापासून येवला तालुक्यातील गणेशनगर या वस्तीसह अनेक गावे पाण्यापासून वंचितच आहेत.