Video : नगर जिल्ह्यात करोना लसीकरण

अंगणवाडी सेविका आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला पहिला डोस
Video : नगर जिल्ह्यात करोना लसीकरण

अहमदनगर | Ahmednagar

करोना लसीकरण मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महानगरपालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे केला.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी लसीचा पहिला डोस घेतला तर जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे ज्योती लवांडे या अंगणवाडी सेविकेस पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने बजावलेली भूमिका महत्वपूर्ण असून पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांना लस देण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात एकूण २१ केंद्र असून पैकी जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय तसेच महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र अशा १२ केंद्रांवर ही मोहिम सुरु झाली.

अहमदनगर महापालिकेच्या जिजामाता नागरी आरो्ग्य केंद्र येथे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह आमदार संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, महानगरपालिकेचे पदाधिकारी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ज्या आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात येणार होते, त्यांची ओळख पटवून पोर्टलवरील त्यांच्या नावाची खात्री झाल्यानंतर त्यांना लसीकरण करण्यात येत होते. अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना लसीकरणाचा पहिला मान मिळाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि आमदार जगताप यांनी पुष्पगु्च्छ देऊन ज्योतीताईंचे कौतुक केले. लसीकरणानंतर काही त्रास होत नाही ना, अशी विचारणाही केली. त्यावर त्यांनी त्रास होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर एका एका क्रमाने आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणास सुरुवात झाली.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. लशीचा पहिला डोस स्वत: जिल्हा शल्य चिकित्सक ड़ॉ. पोखरणा यांनीच घेतला. त्यानंतर लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी लसीकरणासंदर्भातील नियोजनाची माहिती घेतली. करोना लसीकरण मोहिमेसाठी सर्व केंद्रांनी प्राथमिक तयारी यापूर्वीच पूर्ण केली होती. आरोग्य विषयक जनजागृती करणारी रांगोळी आरोग्य केंद्राच्या बाहेर रेखाटण्यात आली होती. लसीकरण देण्यात येणार्‍या आरो्ग्य कर्मचार्‍यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून त्यांना ओळख पटवून तसेच त्यांच्या शरीराचे तापमान मोजल्यानंतर लसीकरणाला नेले जात होते. लस दिल्यानंतर अर्धा तास त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जात होता. सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्या २ तासांत साधारण प्रत्येक केंद्रांवर १२-१४ जणांचे लसीकरण करण्यात आले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com