Friday, April 26, 2024
Homeनाशिकजे नको होतं तेच झालं! अवकाळीने शेतीचे अतोनात नुकसान; पाहा विदारक परिस्थितीचा...

जे नको होतं तेच झालं! अवकाळीने शेतीचे अतोनात नुकसान; पाहा विदारक परिस्थितीचा Video

बोलठाण | प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) बोलठाणसह घाटमाथ्यावर काल सायंकाळी झालेली गारपीट व रात्री झालेल्या पावसामुळे परिसरातील पिकांचे (Crop) होत्याचं नव्हतं करून टाकलं असून शेतीची अतिशय विदारक परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काही क्षणात नाहीसा झाल्याने शेतकरी वर्गावर मोठे संकट कोसळले आहे…

- Advertisement -

काल सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीमुळे शेती पिकांची मोठी वाताहत झाली आहे. यात प्रामुख्याने कांदा, मका, बाजरी, गहू ही पिके संपूर्ण जमीनदोस्त झाल्याने तीन-चार महिन्यापासून पोटच्या पोराप्रमाणे जपलेले पिके डोळ्यासमोर हातातून निघून गेल्याने बळीराजावर मोठे संकट ओढवले आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यंदा राज्यात पाऊस कसा असेल?; स्कायमेटने व्यक्त केला अंदाज

तसेच कापूस, मक्का, लाल कांदा या पिकांना भाव (Rate) नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला उन्हाळ कांदा, उन्हाळ मक्का, उन्हाळ बाजरी आणि गहू या पिकांतून आर्थिक घडी बसण्याची उमेद होती. पंरतु, ती अवकाळीने हिरावून नेल्याने शेतकरी राजा रस्त्यावर आला आहे. तर घरात असलेल्या अन्नधान्याशिवाय आता शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरले नसल्याने पुढे करायचं तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

Video : शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे घाटमाथ्यावर बाजरीचे ६०, कांदा १६००, गहू ३०, फळबाग ४ तर मक्का १० असे अंदाजे हेक्टरी नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचे कृषी विभागाकडून कळते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

घाटमाथ्यावर काल झालेल्या गारपीट व रात्रीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी सहाय्यक, ग्रामसेवक तलाठी यांच्या ग्रामस्तरीय समिती मार्फत प्राथमिक नुकसान पाहणी अहवाल शासनाला पाठविला असून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

सिद्धार्थ मोरे, तहसीलदार, नांदगाव

नांदगाव तालुक्यातील झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली असून नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला शासकीय मदत मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

सुहास कांदे, आमदार, नांदगाव विधानसभा मतदारसंघ

सायंकाळी झालेली गारपीट रात्री झालेल्या अवकाळी पाऊस हा इतका भयानक होता की जीव वाचवावा की पिक वाचवावे अशी अवस्था झाली होती. सर्व हातातून निघून गेल्याने आता मायबाप सरकारने तात्काळ विना अट विनाशर्त मदत जाहीर करावी ही विनंती.

कचरू काकडे, शेतकरी, बोलठाण

- Advertisment -

ताज्या बातम्या