Video : पंडित बिरजू महाराज यांना नाशिकमधून आदरांजली

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नृत्य, संगीत, चित्रकला, भाषा अशा अनेक विषयांमध्ये पं. बिरजू महाराज यांच्या सानिध्यात राहून कथक नृत्याचे धडे घेणारे व प्रत्यक्ष त्यांच्या संपर्कात राहून खूप काही शिकणार्‍या नाशिकच्या नृत्यांंगणा व क्लासेस संचालकांना महाराजांच्या निधनाने दुःख अनावर झाले आहे. बिरजू महाराजांविषयी त्यांनी वाहिलेली ही सुमनांजली…

प्रख्यात कथक नर्तक बिरजू महाराज यांची व माझी पहिली भेट पुण्याच्या बालगंधर्व नाटयगृहात झाली. त्यानंतर आमचे गुरु-शिष्याचे ऋणानुबंध एवढे दृढ होत गेले की ते मला प्रतिमा नावाने ओळखू लागले. दिल्लीत त्यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे घेतले. त्यानंंतर आमच्या किर्ती कला मंदिराच्या रौप्यमहौत्सवी समारंभास त्यांना पाचारण केले.

त्यांनी आपुलकीने येऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली होती. आमचे गुरु-शिष्याचे नाते एवढे वृद्धिंगत होत गेले की मी प्रत्येक कार्यक्रमात त्यांंना भेेटल्या शिवाय राहत नव्हते. माझ्या विद्यार्थीनींनाही त्यांना भेटवत होते. एवढे मोठे कलाकार पण अतिशय साधे आणि आपुलकीने वागणारे पाहून मोठे कलाकर उत्तम कसे असतात याची प्रचीती आली.

बिरजू महाराजांनी अनेकदा नवतेचा अंगीकार केला. संगीत व तबल्याची विशेष जाण असलेल्या बिरजू महाराजांचा महाराष्ट्राशी घनिष्ट स्नेह कायम ठेवला होता. अनेक शिष्य घडवून त्यांनी आपले ज्ञान मुक्तपणे वाटले व गुरुसेवा केली. त्यांना आम्ही कदापी विसरु शकणार नाही.

– रेखाताई नाडगौडा, नाशिक

नृत्य, संगीत, चित्रकला, भाषा अशा अनेक विषयांमध्ये ते निपुण. मी स्वतःला भाग्यवान समजते की अगदी लहान वयात, वयाच्या ८ व्या वर्षी, मला त्यांचा पहिल्यांदा आशीर्वाद मिळाला. आणि तेव्हापासून ज्या ज्या वेळी शक्य असेल त्या त्या वेळी मी आणि माझी ताई, माझ्या गुरु आणि आई रेखा ताईंबरोबर त्यांच्या कार्यशाळेला जात असत.

त्यांच्याकडून शिकताना कधीही त्यांचं ’श्रेष्ठत्व’ त्यांनी जाणवू दिलं नाही. लहान मुलांना अगदी त्यांच्या वयाचं होऊन ते शिकवत असत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कथक जग हे ’अनाथ’ झालंय. कथक जगतात जो महाराजजींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एक आदररुपी धाक वाटत असे, तोच नाहीसा झाल्याने कथकच्या शुद्ध स्वरूपाला धक्का लागणार नाही ना! याची भीतीसुद्धा वाटते. महाराजजी जरी आता नसले तरी त्यांचं कर्तृत्व आणि त्यांनी रुजवलेली तत्वे ही शाश्वत आहेत आणि कायम राहतील.

– अदिती पानसे, नाशिक

नाशिकच्या विद्या देशपांडे यांनी एकदा भरविलेल्या वर्कशॉपमध्ये माझी बिरजू महारांजांशी पहिली ओळख झाली. त्याचवेळी गायन-वादन नृत्याची पूर्ण ओळख मला झाली. कार्यशाळेेत साथसंगत देताना प्रत्यक्ष संबंध आला. त्यावेळी त्यांंनी कथकमधील बारकावे समजावून सांगितले. एवढे मोठे दिग्गज कलाकर मात्र त्यांनी कधीही गर्व केला नाही. त्यांच्यापासून आम्हाला खूप शिकायला मिळाले.

नितीन पवार, नाशिक

पं. बिरजू महाराज यांच्याशी माझा संबंध १९९८ पासुनचा. त्यांच्याकडून मी कथ्थक नृत्याचे धड घेतले. त्यानंंतर आमचा ऋणानुबंध दृढ झाला. २००७ मध्ये महाराज काळाराम मंदिरात कार्यक्रमास आले होते. त्या कार्यक्रमाचा मीदेखील एक भाग होते. त्यावेळी महाराजांची तब्येत अचानक बिघडली होती.

मात्र तरी सुध्द महाराजांनी जो दमदार कर्यक्रम सादर करुन रसिकांंची मने जिंकली तो क्षण कदापी विसरता येणार नाही. त्यानंतर ते रामनवमीच्या दिवशी भर दुपारी बाराला माझ्या घरी आले. मला तर प्रत्यक्ष रामच घरी अवतरल्याचा भास झाला. नंतर माझ्या क्लासला भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवत असलेले पाहून तुम तो सही सिखा रही हो. हे वाक्य आजही माझ्या कानात गणगुणत राहते. त्यांनी माझ्या मुलाचे नाव व्योेम ठेवले आहे.

दीपा मोनानी, नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *