सुयोग्य नियोजनाने झाला 'मोडाळे'चा कायापालट, पाहा व्हिडीओ...
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरापासून साधारणतः १५ ते २० किलोमीटरवर मोडाळे (Modale) हे गाव असून डोंगरदऱ्यात वसलेले आहे. पूर्वी या गावातील ग्रामस्थांना मिळणाऱ्या मुलभूत सुविधा मर्यादित होत्या. हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना एक ते दोन किलोमीटर पायपीट करून पाणी (Water) आणावे लागत होते. त्यामुळे गावातील मुलांना कुणी मुली सुद्धा देत नव्हते. पंरतु, योग्य नियोजन केल्यास गावाचा कायापालट होऊ शकतो हे या गावाने आता एकजुटीतून दाखवून दिले आहे...
याबाबत गावचे नागरिक व माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके (Gorakh Bodke)यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. त्यामुळे गावातील मुलांना कुणी मुली देखील देत नव्हते. त्यानंतर गावातील धरणा शेजारी दोन विहिरी खोदून त्याठिकाणाहून दोन पाईपलाईनद्वारे गावात पाणी आणून प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी दिले. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला असून सध्या गावात दिवसातून तीन वेळेस पाणी येत असल्याचे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, गावातील रस्त्यांवर (Road) पूर्वी चिखलाचे साम्राज्य होते. मात्र, शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक गल्लीत सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे रस्ते करण्यात आले आहेत. याशिवाय गावात स्वतंत्र्य ग्रामपंचायत कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, ग्रीन जिम, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी सुसज्ज हॉल, पथदीप, सौर ऊर्जेवर वीजपुरवठा अशा सोयी-सुविधा उपलब्ध असल्याचे बोडके यांनी सांगितले.