अहमदनगर उड्डाण पूलासाठी सॉईल टेस्टींग
व्हिडिओ स्टोरी

अहमदनगर उड्डाण पूलासाठी सॉईल टेस्टींग

लोकप्रतिनिधींऐवजी अधिकार्‍यांच्या हस्ते सॉईल टेस्टींगच्या कामास सुरूवात

Sarvmat Digital

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आणि गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये चेष्टेचा विषय झालेल्या उड्डाणपुलाच्या कामास अखेर मुहूर्त मिळाला आहे. राजकीय आरोपांच्या फैरीचे कारण ठरलेल्या या कामात खोडा येऊ नये, हीच आता नगरकरांची अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्याहस्ते सॉईल टेस्टींगच्या कामास सुरूवात झाली आहे.

सक्कर चौक ते स्टेट बँक चौक, सक्कर चौक ते चांदणी चौक, सक्कर चौक ते थेट महापालिका मुख्यालयाच्यापुढे असे वेगवेगळे अंतर सांगत उड्डाणपूल होणार असे सांगण्यात येत होते. अर्थात त्यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्याचे चौपदरीकरण सुरू असल्याने त्यातच या कामाचा सामावेश करण्याचे ठरले होते.

त्यानुसार काही प्रमाणात जागा अधीग्रहणही झाले होते. उड्डाणपुलाच्या कामाला प्राथमिक सुरुवात झाली होती. ही सुरूवात होताच, काम करणार्‍यांना काही जणांनी मारहाण केल्याने तेव्हापासून हे काम बंद पडले आणि नंतर उड्डाणपूल रद्द झाल्यात जमा होता. अर्थात त्यापूर्वी संबंधित ठेकेदारासमवेत तत्कालीन राज्य सरकारने बैठका घेतल्या होत्या. परंतु त्यास ठेकेदाराने न जुमानल्याने उड्डाणपूल एक स्वप्नच राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर त्या अंतर्गत हे काम करता येईल का, याची चाचपणी तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी केली. त्यास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखविला. केवळ हिरवा कंदीलच दाखविला नाही, तर सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय महामार्गच्या अधिकार्‍यांचे पथक नियुक्त केले. त्यांनी नगरमध्ये येऊन पाहणीही केली. तसा अहवाल सादर करत राष्ट्रीय महामार्गात या कामाचा समावेश करण्यात आला.

त्यासही अनेक वर्षे लोटल्याने हा विषय पुन्हा चर्चेचा आणि राजकीय टीकेचा झाला. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन झाले. त्यावेळीही निवडणुकीच्या तोंडावर दाखविलेले लालूच, असे म्हणत हिणवण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांनी या विषयाला पुन्हा गती दिली. खासगी मालकाच्या जागा अधिग्रहित करतानाच संरक्षण विभागाची जागा मिळविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

त्यास गेल्या महिन्यात यश आले अन् या कामास गती मिळाली. उड्डाणपुलाच्या श्रीगणेशा साठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्याहस्ते पायासाठी आवश्यक असलेले माती परीक्षण (सॉईल टेस्टिंग) कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण उपस्थित होते.

या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे अडीच ते तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित असून सुमारे तीनशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी सांगितले. प्रत्यक्ष माती तपासणीचा अहवाल एक महिन्यात येणे अपेक्षित आहे. अहवालानुरूप प्रत्यक्ष पायाभरणीचे काम होईल, असे दिवाण म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com