
सप्तशृंगी गड | वार्ताहर | Saptashrungi gad
सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) सुरक्षा रक्षक (Security Guard) नव्याने रुजू केल्याबाबत त्यांची हकालपट्टी करणे, तसेच इतर मागण्यांसाठी ग्रामस्थांनी पहिली पायरी ते रोपवे ट्रॉली आणि ट्रस्ट कार्यालय येथे रॅली काढत निषेध व्यक्त करण्यात आला....
विश्वस्थ संस्थेच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांनी बंद एल्गार पुकारला आहे. यामध्ये सरपंच, सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रामस्थ, व्यापारी, लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. अनेक ग्रामस्थांचा वतीने आपापले मुद्दे मांडण्यात आले.
यावेळी तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी ग्रामस्थांचा मागण्या दहा दिवसांत बैठक घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र ग्रामस्थांनी बेमुदत बंद निर्णय घेण्याचा विचार करताच अप्पर जिल्हाधिकारी यांनी सप्तशृंगी ग्रामपंचायत सदस्य व व्यापारी यांचाशी संपर्क साधला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गावातील नागरिकांनी सप्तशृंगीगडावरचे दुकाने बंद करून निषेध व्यक्त करण्यास ठरवले आहे.
दरम्यान, भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र ग्रामस्थांनी बेमुदत बंद पुकारल्याने गाव बंद असणार आहे.
नव्याने रुजू केलेल्या सुरक्षारक्षकावर वर्षाचा एक कोटी पंचवीस लाखाचा खर्च भाविकांच्या देणगीतून विश्वस्थ संस्था उधळपट्टी करत आहे. तो खर्च भाविकांच्या सुख सुविधेसाठी वापरावा. उर्वरित निधी तीन मजली दवाखाने एम. डी मेडिसीन डॉकटरची नेमणूक करून तसेच शौचालय, स्नान गृह, पहिली पायरी ते मंदिर परिसर प्रथम उपचार बॉक्स, तसेच स्थानिक जुन्या कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून सुरक्षारक्षक म्हणून समाविष्ट करावा.
- अजय दुबे, उपजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नाशिक.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या रोपवे ट्रॉलीमधील अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधार्थ ब्रेक दिलेल्या आदिवासी तरुणांना पुन्हा कामात समाविष्ट करावे.
धनंजय गायकवाड, ग्रामस्थ, सप्तशृंगी गड.
सप्तशृंगी गडावर ग्रामस्थांचा वतीने बेमुदत गाव बंदीची हाक पुकारली असून जो पर्यंत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विश्वस्थ काम करत नाही, तसेच ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत गाव बंद करून निषेध व्यक्त करण्यात येईल.
- रमेश पवार, सरपंच, सप्तशृंगी गड
काही निमशाशकीय सुरक्षारक्षक संस्थांच्या वतीने ठेवण्यात आले आहे. मात्र गावातील तरुण युवक बेरोजगार असल्यामुळे विश्वस्थ संस्थेने गावातील नागरिकांना रोजगार मिळवून द्यावा व नव्याने रुजू केलेल्या सुरक्षारक्षकांची हकालपट्टी करावी.
- दत्तू बर्डे, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंगी गड.