Video : ...म्हणून नाव पडले 'सांडव्यावरची देवी'

Nashik | Panchvati

पंचवटीतील गोदावरीच्या काठावरील ‘सांडव्यावरची देवी’ (Sanvyavarchi Devi) किंवा ‘राजेबहाद्दरांची देवी’ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सांडव्यावरची देवी ही साक्षात गडावरची सप्तशृंग निवासिनीच आहे (Saptshrungi Devi). त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंगगडावरील देवीसारखीच आहे. मूर्ती अतिशय भव्य आहे. मुख्य म्हणजे गडावरच्या देवीप्रमाणेच याही देवीला अठरा हात आहेत. देवीच्या या अठरा हातांत मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. देवीने डाव्या बाजूला एक हात कानावर टेकलेला असून, जणू काही देवी भक्तजनांची गाऱ्हाणी एकत आहे असे वाटते.

हल्लीच्या राजेबहाद्दर यांचे पूर्वज नारोशंकर राजेबहाद्दर हे सप्तशृंगनिवासिनी देवीचे निस्सिम भक्त. दर पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात असत. पुढे वयोमानानुसार त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले. आपल्याला आता देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली, तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली. देवीसाठी अनुष्ठान केले.

त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला, 'ठीक आहे. मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन. मात्र, माझी एक अट आहे. तू मागे वळून पाहू नकोस. जर तू मागे वळून पहिले, तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेन.

'नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली. ते पुढे आणि त्यांच्या मागे देवी निघाले. गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पहिले नाही. मात्र, पंचवटीत येताच त्यांच्या मनात शंका आली. देवीने आपल्याला फसविले तर नाही? त्यामुळे त्यांनी मागे वळून पहिले. साक्षात सप्तशृंगनिवासिनी त्यांच्या समोर उभी होती. ती म्हणाली, 'मुला, तुझ्या मनांत शंका आली. आता मी येथेच थांबते.

'आणि ती तिथेच अदृश्य झाली. देवी ज्या ठिकाणी गुप्त झाली त्याच जागेवर नारोशंकर राजेबहाद्दरांनी मंदिर बांधले, तेच हे सप्तशृंगनिवसिनीचे सांडव्यावरील देवी मंदिर. सुमारे २५० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सध्या नारोशंकरांची दहावी पिढी सांडव्यावरील देवीची नित्यनियमाने पूजा करते. तिचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. अशी या देवीची आख्यायिका सांगितली जाते.

Related Stories

No stories found.