Video : शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाची तुफान बॅटिंग
नाशिक | Nashik
अवकाळी पावसानंतर ( Unseasonal Rains) प्रचंड उकाड्याने शहर व जिल्हावासीय हैराण असतानाच आज शहरासह जिल्ह्यात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळत वातावरणात गारवा निर्माण झाला आहे...
आज रविवार (दि.०४) रोजी सकाळपासूनच शहर व जिल्ह्यातील अनेक भागांत वातावरणात बदल होत संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. या ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून ऊन सावलीचा खेळ सुरु होता. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पाऊस कोसळणार असे चित्र निर्माण झाले होते.
त्यानंतर आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरात (Nashik City) पावसाने १५ ते २० मिनिटे तुफान बॅटिंग केल्याने जागोजागी पाणी (Water)साचले होते. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची देखील चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय त्र्यंबकेश्वर येथे पावसाने तब्बल अर्धा तास जोरदार हजेरी लावल्याने शहरात अंधारून आल्यामुळे सायंकाळ झाल्यासारखे वाटत होते. या पावसामुळे शहरातील लक्ष्मी नारायण चौकात मोठ्या प्रमाणावर पाणीच-पाणी साचले होते.
तसेच बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) पश्चिम आदिवासी पट्ट्यातील पर्यटनस्थळ असलेल्या साल्हेर किल्ल्याच्या परिसरासह ब्राह्मणगांवात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गड येथे सुद्धा पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली.