Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : दोन वर्षांनंतर निघाली दाजीबा वीरांची मिरवणूक

Video : दोन वर्षांनंतर निघाली दाजीबा वीरांची मिरवणूक

पंचवटी| Panchavati

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वीरांची मिरवणूक आज शहरात उत्साहात साजरी झाली. करोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून मिरवणुकीस परवानगी देण्यात आली नव्हती. यंदा मात्र परवनगी मिळताच गेल्या दोन वर्षाची कसर कार्यकर्त्यांनी भरून काढली…

- Advertisement -

जुने नाशिक येथून दाजीबा वीरांच्या (Dajiba Veer) मिरवणुकीला सुरुवात झाली. दाजीबा-वीरांचे रूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नवसाला पावणार्‍या या दाजीबांचे रूप हे बघण्यासारखे होते.

डोक्याला फेटा, त्यावर खंडेराव महाराजांचा मुखवटा, कपाळावर मुंडावळ्या, कानात सोन्याच्या बाळ्या, गळ्यात सरी, अंगात सदरा, कमरेला धोतर, हातात कडे ,बाशिंग परिधान केलेला हा दाजीबा वीर सगळ्यांचेच नाचून लक्ष वेधून घेत होता.

शेकडो वर्षांपूर्वी सदाशिव भागवत (Sadashiv Bhagwat) यांच्यापासून चालत आलेली ही दाजीबा वीरांची मिरवणूक आज लक्ष्यवेधी ठरली. त्यांची चौथी पिढी विनोद बेलगावकर (Vinod Belgaonkar) यांच्या रूपाने दाजीबा-वीर होऊन ही परंपरा जिवंत ठेवत आहे.

नवसाला पावणारा दाजीबा म्हणून याची ओळख आहे. दाजीबा वीरांचे पाय धरून दर्शन घेतात व नारळ खणाची ओटी भरतात. त्या भक्ताला एका वर्षाच्या आत हा दाजीबा वीर पावतो, अशी भावना असल्याने ओटी भरण्साठी भाविकांची लगबग सुरु होती. यालाच बाशिंग वीरांचा शिमगा असे देखील संबोधले गेले. प्रत्येक वीर होळी भोवती प्रदक्षिणा घालून घरातील टाकाचे रामकुंंडात पूजन करुन स्नान घालताना दिसून आले.

पारंपारिक वाद्यात दाजीबा वीरांची मिरवणूक जुन्या नाशिकपासून रामकुंडापर्यंत (Ramkund) काढण्यात आली. रामकुंडावर या दाजीबा वीरांच्या मिरवणुकीची (Miravnuk) सांगता झाली. मिरवणुकीदरम्यान बरेच भाविक आपल्या देवघरातील टाक या मिरवणुकीत नाचवताना दिसून येत होते.

रस्त्यावर बर्‍याच ठिकाणी दाजीबांच्या मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव केला जात होता. विविध देवदेवतांच्या वेशभूषेत हे वीर नाचत गाजत रामकुंडावर आले. रामकुंडावर जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या