Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedVideo सध्याच्या आपात्कालीन परिस्थितीला ‘ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर’ सक्षम पर्याय

Video सध्याच्या आपात्कालीन परिस्थितीला ‘ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर’ सक्षम पर्याय

राकेश कलाल

नंदुरबार | NANDURBAR

- Advertisement -

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. नंदुरबार जिल्हयातही दररोज शेकडो रुग्ण आढळत आहे. ऑक्सीजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण दगावण्याची संख्या मोठया प्रमाणावर आहे. मात्र, हवेतील नैसर्गिक प्राणवायू ‘ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर’ या यंत्राद्वारे सरळ रुग्णांना देता येणे शक्य असल्याने रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी हा सक्षम पर्याय ठरु पाहत आहे.

याबाबत जिल्हयातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालून उपाययोजना करण्याची गरज आहे. नंदुरबार येथील जेके पार्क इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे डॉ.किस्मत शेख यांनी आतापर्यंत २० यंत्र आणले असून रुग्णांसाठी ते जीवनदायी ठरत आहेत.

गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनारुपी राक्षसाने थैमान घातले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी हा आजाराने रौद्ररुप धारण केले आहे. दररोज हॉस्पीटलमध्ये बेड नाही, ऑक्सीजन बेड उपलब्ध नाही, खाजगी हॉस्पीटलही हाऊस फुल्ल असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होतांना दिसत आहेत.

केवळ ऑक्सीजन बेड उपलब्ध झाला नाही म्हणून रुग्ण दगावण्याची संख्या ही लक्षणीय आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडे किंवा सरकारकडे ऑक्सीजनचे सिलींडर वेळेवर पुरवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. याशिवाय उपलब्ध होणार्‍या ऑक्सीजन सिलींडरमधील ऑक्सीजन किती शुद्ध आहे याची तपासणीही होत नाही.

त्यामुळे कदाचित अशुद्ध ऑक्सीजनचा पुरवठा झाल्यानेही रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात शासकीय यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. जिल्हा रुग्णालयात तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे.

तेथे दररोज पुरवठा करण्यात येणार्‍या ऑक्सीजनच्या सिलींडरची रुग्णांच्या नातेवाईकांकडून पळवापळवी होते. सिलींडर संपण्यापुर्वीच नातेवाईक रुग्णाच्या बेडखाली ते लपवतांना दिसत आहे. आपल्या रुग्णाला वाचविण्यासाठी नातेवाईकांची ही धडपड दररोज पहायला मिळते.

मात्र, हवेतील नैसर्गिक ऑक्सीजन रुग्णाला मिळाले तर त्याचे निश्‍चितच प्राण वाचणाार आहे. यासाठी ‘ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर’ हा एक सक्षम पर्याय म्हणून पुढे आला आहे. या यंत्राद्वारे नैसर्गिक हवा शोषली जाते. हवेतील इतर सर्व वायु वेगळे करण्यात येवून फक्त शुद्ध ऑक्सीजन तयार होतो.

तो सरळ रुग्णाला देता येणे शक्य आहे. यामुळे रुग्णाला शुद्ध ऑक्सीजनचा पुरवठा होवून त्याचे प्राण वाचू शकणार आहेत. ऑक्सीजनची पातळीदेखील कमी जास्त करता येते. एका मशिनमध्ये दोन रुग्णांना एकाचवेळी ऑक्सीजन पुरवठा होवू शकतो. विशेष म्हणजे या यंत्रामध्ये नेब्युलायझर अर्थात वाफ देण्याचीही सुविधा आहे.

त्यामुळे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर हा सक्षम पर्याय सिलींडरद्वारे पुरवठा होणार्‍या ऑक्सीजनला ठरु पाहत आहे.

सदर ‘ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर’हे नंदुरबार येथील जेके पार्क इंटरनॅशनल फाऊंडेशनचे चेअरमन डॉ.किस्मत शेख यांनी उपलब्ध करुन दिले आहेत. या यंत्राचे आज औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. अज़हर पठान, सय्यद रफअत हुसैन, हाफ़िज अखलाक, मौलाना मुज़म्मील, सय्यद अज़हर मियॉं, अब्दुल जब्बार गणी आबिद मिस्त्री उपस्थित होते.

‘ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर’ हे यंत्र हवेपासून ऑक्सीजन तयार करते. नैसगिक प्राणवायु मिळत असल्याने रुग्णांच्या प्रकृतीत हमखासपणे सुधारणा होते. हे मशिन वीजेवर तसेच इन्व्हर्टरवर चालु शकते. सदर मशिन खुल्या हवेत किंवा खिडकीजवळ ठेवल्यास त्याचा चांगला परिणाम दिसतो. या मशिनची किंमत ४५ हजारापर्यंत आहे. एकदा मशिन लावल्यानंतर त्याला कुठलाही खर्च नाही की सिलींडर आणण्याचा त्रास नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचलीत ऑक्सीजन लावण्याच्या पद्धतीला हा एक चांगला पर्याय आहे. डॉ.किस्मत शेख चेअरमन, जे.के.पार्क इंटरनॅशनल फाऊंडेशन, नंदुरबार

- Advertisment -

ताज्या बातम्या