...तरच शेतकरी जगू शकेल; येवल्यातील कांदा उत्पादकांनी व्यक्त केली खंत
नाशिक | Nashik
नाशिक हा जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी (Grape Production) देशभरात ओळखला जातो. त्यानंतर आता कांद्याच्या (onion) उत्पादनासाठी देखील नाशिक जिल्हा ओळखला जात असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामध्ये येवला तालुक्याचे (Yeola Taluka) नाव अग्रभागी आहे.
येवला तालुक्यातील काही भाग हा कोरड म्हणून गणला जातो. तर काही भाग बागायती आहे. मात्र, अशाही परिस्थितीत या तालुक्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) आलेल्या अडचणींना सामोरे जात शेतीला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील शेतकऱ्यांची पीकपद्धत आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी देशदूतच्या टीमने येथील शेतकरी भारत सखाराम नागरे यांच्या शेतीच्या (Agriculture) बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी शेतकरी भारत नागरे यांनी देशदूतशी बोलतांना सांगितले की, आम्ही सुरुवातीला ऊस (Sugar Cane) लागवड करत होतो. मात्र, पाण्याची (Water) कमतरता भासू लागल्याने कांद्याच्या पिकाकडे वळालो. त्यानंतर आठ ते दहा वर्षांपासून कांद्याची लागवड करत असून सुरुवातीला तीन ते चार वर्षे कांदा पिक परवडले. पंरतु,नंतरच्या काळात मात्र हे पिक परवडण्यासारखे राहिले नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळण्याचा विचार करत आहेत, असे ते म्हणाले.
तसेच पुढे ते म्हणाले की, कांदा पिक तयार होण्यासाठी साधारण चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यासाठी लागणारी खते, औषधे आणि मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. पण, कांद्याचे भाव (Price) मात्र फारसे सुधारलेले नाहीत. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पन्न परवडण्यासारखे नसल्याची खंत नागरे यांनी बोलून दाखवली. त्याबरोबरच शासनाने (Government) शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसायाची तरतूद करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.