राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष : माळरानावर थायलंड संशोधित पेरू लागवड
नाशिक | विजय गिते
शेतकरी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करू लागला आहे. यापुढे शेती करताना नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करणे गरजेचे असून शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने प्रयोग करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. उद्या (दि.23) राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त शेती क्षेत्रात विविध आधुनिक प्रयोग करणार्या तज्ज्ञांशी ‘देशदूत’ ने साधलेला संवाद....
चांदवड तालुक्यातील खडक ओझरमधील शेतकरी सिद्धार्थ केदारे यांनी एका माळरानावरील जमिनीवर थायलंड संशोधित पेरूच्या झाडांची लागवड केली असून त्यांचा हा प्रयोग शेतकर्यांना एक आदर्शवत आहे.त्यांनी 12 बाय 2 फुटाच्या अंतरावर 1 एकर क्षेत्रावर 1815 पेरूची झाडे लावली असून या झाडांना बारमाही पेरू येत असल्याने त्यांना सदाबहार पेरू म्हटले जाते. तसेच तीन एकर क्षेत्रावर 12 बाय 2 फुटाच्या अंतरावर जी पेरूची झाडे लावली जातात ती फक्त 1 एकरवर लावली आहेत.
यासोबतच साडेबारा एकरमध्ये 10 हजार झाडे आहेत. एका प्लॉटमध्ये ड्रॅगन फूटची लागवड करण्यात आली असून आंतरपिक म्हणून मध्यभागी पेरूची झाडे लावली आहेत. तर इतर भागात काजू, चिंच, अॅपलबोरसह इतर देशी-विदेशी झाडांची लागवड केली आहे.यासर्व झाडांना ड्रीपच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात असून त्यासाठी दीड कोटी लिटर पाणीसाठ्याची दोन शेततळे तयार केली आहेत. त्याचबरोबर शून्य मशागतीच्या शेतीचा प्रयोग अवलंबिला असून माती जपण्याचा प्रयत्न केला आहे.