राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष : 'नैसर्गिक शेती' हाच उत्तम पर्याय
नाशिक | विजय गिते
शेतकरी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करू लागला आहे. यापुढे शेती करताना नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करणे गरजेचे असून शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने प्रयोग करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. उद्या (दि.23) राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त शेती क्षेत्रात विविध आधुनिक प्रयोग करणार्या तज्ज्ञांशी ‘देशदूत’ ने साधलेला संवाद....
जगभरातील कृषी क्षेत्र बरोबरच पर्यावरण राखण्यासाठी व पुढील पिढी वाचवायची असेल तर पाश्चात्य संस्कृतीला त्यागून नैसर्गिक शेती करणे हाच आपल्यासमोर उत्तम पर्याय आहे. कारण करोना महामारी,रुस-युक्रेन महायुद्धामुळे वैश्विक महामंदी आली आहे. तापमान वृद्धीमुळे मानवी जीवनात बदल होत आहे. याचे घातक परिणाम मानवी जीवनाबरोबरच कृषी व पर्यावरणावर देखील होत चालले आहे. या सर्व गोष्टी मानवनिर्मित आपत्ती असून याच्याशी आपल्याला आता दोन हात करावे लागणार आहे.
शेती व्यवसाय करताना रासायनिक शेतीपासून दूर जाऊन जैव कृषी, शेणखतावरील शेती आपल्याला करावी लागणार आहे. सुभाष पालेकर यांच्या पद्धतीनुसार शेती केल्यास निश्चितच फायदे होणार आहेत. शेतकर्यांच्या असलेल्या समस्यांवर मात केल्यास समाधान मिळेल, असे काम करणे गरजेचे आहे. एक देशी गाय असेल तर 30 एकर शेती सहजरीत्या आपण करू शकतो. रासायनिक खतांचा वापर कमी करून आपल्याकडील वनस्पतींची फवारणी ही आपल्याला या तंत्रज्ञानात करता येऊ शकते.त्यासाठी महागाची औषधे घेण्याची गरज नसून गोमूत्रातून आपल्याला हे सर्व काही मिळू शकते.
यातून उत्पादन घटत नाही तर ते वाढतेच. उत्पन्नही वाढते. पोषणद्रव्येही मिळतात.कॅन्सर, डायबिटीसने आपल्याला भविष्यात मृत्यू नको आहे. घातक परिणाम वाढत असल्याने ते कमी करण्यासाठी संपूर्ण जग आता सजग होत आहे. कृषी पर्यावरण व पुढील पिढी वाचवायची असेल तर सुभाष पालेकर यांची शेती पद्धती अवलंबावी लागेल. शासनाचेही यामध्ये धोरण महत्त्वाचे राहणार आहे.