Video : नाशिककरांनी बसवला जर्मनीत गणपती बाप्पा

Video : नाशिककरांनी बसवला जर्मनीत गणपती बाप्पा
गणपती

नाशिक। वैभव कातकाडे

नाशिकसह देशभर सध्या गणेशोत्सव साजरा आहे. मात्र जर्मनीत (Germany) राहणारे काही उत्साही भारतीय तरुण (Indian Youth) यंदा जर्मन भूमीवर गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा करीत आहेत. गणेश चतुर्थीला त्यांनी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केली. जर्मनीत राहून अनेक भारतीय सण-उत्सव साजरे करणाऱ्या या तरुणांनी त्यात आता गणेशोत्सवाची भर घातली आहे. त्यांच्या गणेशोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे....

जर्मनीमधील येथे राहणाऱ्या कौस्तुभ शालिग्राम (Kaustubh Shaligram) यांनी व्यक्त केलेले मनोगत बोलके आहे. 'लोकांनी एकत्र यावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी शिवजयंती (Shivjayanti) आणि गणेशोत्सव (Ganesh Festival) सुरु केल्याचे शाळेत असताना आम्ही शिकलो. लहानपणी शिकलो त्याचा अनुभव आम्ही आता जर्मनीत घेत आहोत' असे शालीग्राम म्हणतात. आपल्या घरात विराजमान झालेल्या बाप्पाबद्दल त्यांनी 'देशदूत'शी संवाद साधला.

जर्मनीमधील वेगवेगळ्या शहरांत राहणाऱ्या भारतीय तरुणांनी एकत्र येऊन लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सवाचे आयोजन केले. जर्मनीत ऑपरेशनल एक्सेलन्सचे (Operational Exlance) विद्यार्थी असलेले १० युवक एकत्र येऊन नेहमीच भारतीय सण तेथे साजरे करतात. तेथे गणेशोत्सव साजरा करण्याची ही पहिलीच वेळ!

त्यांच्यापैकीच एक जण रणजित काही महिन्यांपूर्वी भारतात आला होता. त्यावेळी त्याने जर्मनीला परतताना बाप्पाची सुंदर मूर्ती सोबत नेली. यंदा जर्मनीत बाप्पा विराजमान करायचा, त्याचा उत्सव करायचा असे सर्वांच्या मनात होते. मात्र बाप्पासाठी लागणारे पूजा साहित्य कसे मिळणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता.

मात्र बाप्पाचा उत्सव साजरा करायचे ठरवल्यावर सर्व काही जुळून आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना सर्व साहित्य मिळत गेले. फळे, सुपारी, दुर्वा, फुले, झेंडूची फुले आदी साहित्य मिळवले गेले. पूजेच्या वस्तू विनासायास मिळत गेल्याने युवकांचा उत्साह द्विगुणित झाला आणि त्याच उत्साहात बाप्पा विराजमान झाले. या युवकांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे बाप्पा विराजमान होत असल्याचे कळवले. पहिल्याच दिवशी ४५ भाविक बाप्पाच्या उत्सवाला हजर झाले. प्रसादासाठी शिरा, काजू कतली, भाकरवडी आदी नैवेद्यदेखील विनासायास मिळाल्याचे हे युवक सांगतात.

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, कराड, मंचर आदी ठिकाणांहून हे युवक जर्मनीत वास्तव्यास आहेत. त्यात कौस्तुभ शालिग्राम, अक्षय सुर्वे, भाविक सोनवणे, सुमित फडतरे, सुरज कोंढारे, अनिरुद्ध शेटके, पंकज आवारी, रणजीत काळे आणि अक्षय भुसारे यांचा समावेश आहे.

एकीचे बळ फलदायी

जर्मनीत गणेशोत्सव साजरा करताना पूजेच्या सर्व वस्तू मिळवणे हे आव्हानच होते. मात्र एकीचे बळ काय असते ते उत्सव साजरा करताना लक्षात आले. एकीचे बाळ फलदायी ठरले. त्यामुळे सर्व सोपे होत गेले. येथून पुढेदेखील आम्ही दरवर्षी गणेशोत्सवासह इतर भारतीय सण-उत्सव साजरे करणार आहोत, असे कौस्तुभ शालिग्राम यांनी सर्वांच्या वतीने सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com