अव्वल ‘ग्रीन सिटी’ होण्याची नाशिकला संधी

नाशिक | Nashik

नाशिकमध्ये (nashik) झाडे लावण्यापासून (tree plantation) जल संवर्धनापर्यंतच्या (Water conservation) कार्यात व्यावसायिक मंडळींनीदेखील आत्मीयतेने लक्ष देण्याची गरज आहे. त्यातून नाशिकचे भौगोलिक सौंदर्य वाढण्यास मदत होईल.

विकेंड होम्ससोबत (Weekend Homes) 'मेडिकल टुरिझम' (Medical tourism) म्हणून असो किंवा नैसर्गिक सौंदर्य; ते अनुभवण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक नाशिककडे आकर्षित होतील. त्यामुळे नाशिकचे पर्यटन (tourism) कित्येक पटीने वाढेल. येणार्‍या पर्यटकांना राहण्यासाठी चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी बांधकाम व्यावसायिक प्रयत्नशील राहतील, असे मनोगत नाशिकच्या पाटील ग्रुप ऑफ बिल्डर्सचे संचालक नितीन पाटील (Nitin Patil, Director, Patil Group of Builders) यांनी व्यक्त केले. 'देशदूत पर्यटन विशेष' मालिकेत पाटील यांच्याशी मदेशदूतफच्या संंपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांंनी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी नाशिकमध्ये पर्यटन व्यवसायाला (Tourism business) कसे वृद्धिंगत करता येईल? त्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत? याविषयी मते मांडली.

नाशिकचे वातावरण राहण्याबरोबरच पर्यटनासाठीसुद्धा अनुकूल आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अतिशय वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिक नावारूपास आले आहे. नाशिकच्या विकासात पर्यटन क्षेत्र मोलाची भूमिका बजावू शकेल. त्या दृष्टीने कसे पाहता?

आल्हाददायक वातावरणासाठी नाशिक महाराष्ट्रासह जगभर ओळखले जाते. विकसित होताना नाशिकचे नाशिकपण हरवणार नाही, ते अबाधित राहावे याकरता सर्वच स्तरांवरुन सचोटीचे प्रयत्न व्हायला हवेत. बांधकाम व्यावसायिकांनी त्यात विशेषत्वाने लक्ष घातले पाहिजे. आम्ही त्या दृष्टीने विशेष प्रयत्न करीत आहोत. नाशिकमध्ये इमारती बांधत आहोत. मात्र त्या उभारताना नैसर्गिक वातावरण अबाधित राखण्याची काळजीही घेत आहोत. त्याकरता तीन प्रकल्पांवर काम सुरु आहे. पहिला प्रकल्प म्हणजे नाशिकच्या जंगलांमध्ये तसेच विविध डोंगराळ भागात साडे सहा लाख सीडबॉल टाकणे. यातून पारंपरिक झाडांचे जंगल निर्माण होईल. आम्ही बांधत असलेल्या प्रत्येक फ्लॅटच्या बदल्यात 100 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.

आम्ही बांधलेल्या 145 घरांच्या मोबदल्यात नाशिक परिसर, एमआयडीसी भागात आगामी तीन वर्षांत 14,500 हजार झाडे लावणार आहोत. सिमेंटचे जंगल उभे राहत असताना सोबतच नैसर्गिक जंगल निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. दुसरा उपक्रम म्हणजे सहा लाख प्लास्टिकच्या बाटल्या रॅप करून व त्यांच्या ब्रिक्स बनवून त्यापासून गरीब मुलांच्या शाळेत टॉयलेट, बाथरूम्स बांधून देण्यात येणार आहेत. हा उपक्रम इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांच्या सभागातून केला जाणार आहे.

त्यामुळे मुलांना प्लॅस्टिक वापराबद्दल जागरुकता निर्माण होईल. प्लास्टिकचा पुनर्वापराचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. तिसरी संकल्पना सोमेश्वर मंदिर ते आनंदवल्ली या 3 किलोमीटरच्या अंतरात गोदावरीचे पाणी स्वच्छ ठेवायचे. तिथे मनपाच्या सहयोगाने चांगल्या प्रकारे ङ्गक्रूज बोटिंगफ करून घ्यायचे. आपल्या शहरातील नदी किती सुंदर आहे याची ओळख करुन देण्यासोबतच पर्यटनालाही चालना मिळेल. सर्व बांधकाम व्यावसायिकांनी असा दृष्टीकोन स्वीकारून काम केले तर नाशिक देशातील अव्वल दर्जाचे मग्रीन सिटीफ म्हणून नावारूपास येऊ शकेल.

शहराच्या निसर्गाचे रक्षण करताना जलसंवर्धनासाठी आपण काम हाती घेणार आहात. त्याविषयी सांगा.

ज्या वास्तूला पाणी लागते त्या पाण्याची सोय तेथेच करणे गरजेचे आहे. बांधकामाला पाणी लागते आणि नंतर तेथे लोक राहायला येतात. त्यांनासुद्धा पाणी लागते. आज आपल्याकडे आहे त्यातूनच आपण पाणी उचलतो. त्या साठ्याची क्षमता कमी होत आहे याचाही विचार झाला पाहिजे. आम्ही त्या दृष्टीने विचार केला आहे. गंगापूर धरणात एक लाख ट्रक माती परिसरातील शेतीतून पाण्यासोबत वाहून आली आहे. त्यामुळे गंगापूर धरणाची साठवण क्षमता 50 टक्क्यांनी घटली आहे. पाणलोट क्षेत्रातील शेतांचा गाळ 25 वर्षांपासून धरणात येऊन साचला आहे. धरणातील माती शेतकर्यांना काढून दिली तर त्यामुळे धरणाची साठवणक्षमता वाढेल. सोबतच शेतकर्‍यांची शेते गाळाच्या मातीमुळे सुपीक होण्यास मदत होईल. त्यातून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल. यापूर्वी आम्ही धरणातून 2,200 ट्रक गाळ उचलून चार कोटी लिटर पाणी साठवणूक वाढवली आहे. याची गोळा बेरीज केली तर माझ्या मते पाणी आणि झाड यावर 10 रुपये स्क्वेअर फूटसुद्धा खर्च होणार नाहीत. फ्लॅट विकताना प्रति चौरस फूट दर आकारणी करून घेता येईल. त्यातून घराच्या मोबदल्यात सामाजिक योगदान दिल्याचे समाधान सर्वांना लाभेल.

नशिकला येणार्या पर्यटकांबद्दल तुम्ही काय सांगाल? बहुतांश लोक सेकंड होमची संकल्पना राबवत आहेत. ती नाशिकची किती उपयुक्त आणि पर्यटनपूरक ठरेल?

पर्यटक नाशिकमध्ये का येतात? त्याचे कारण आपल्याकडचे आल्हाददायक वातावरण, निसर्गरम्य परिसर होय. नाशिक परिसरात दर 50 किलोमीटरवर प्रेक्षणीय असे काही ना काही ठिकाण पाहावयास मिळते. सकाळी जाऊन संध्याकाळी घरी परत येऊ शकता. वणी, शिर्डी, सापुतार्याहून परत येऊ शकतो. सोबतच नाशिकमध्ये प्रामुख्याने पंचवटी, पांडवलेणे, ब्रह्मगिरीमागे सुंदर डोंगर आणि झरे आहेत. ते आपल्या नाशिकच्या बहुतेक लोकांनी अजून पाहिलेले, अनुभवलेले नाहीत. तिथे मुंबईचे खूप लोक जातात.

म्हणून आपल्याकडे पर्यटनाचा सर्वात जास्त मोठा स्त्रोत आहे. हॉटेल्सच्या तुलनेत तेथे छोटे-छोटे होस्टेल्स सेवा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले पाहावयास मिळतील. सोबतच शहराबाहेरील भागात नव्याने हजारो बंगलोज उभे राहत आहेत. त्यातून पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर दिला जात आहे. अमेरिकेसह परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. 10 ते 15 दिवस तेथे राहतात. नाशिकमध्ये घर घेऊन राहतात. तात्पुरत्या इतक्या सोयी आता झालेल्या आहेत. अल्पावधीसाठी सोयी-सुविधांयुक्त फ्लॅटस्, होस्टेल्स्ही मिळायला लागले आहेत. म्हणजे शहर वाढवताना त्याचा विचार पण आपण करतोय. प्रत्येक जण काही ना काही प्रकल्प घेऊन येत आहे. हा दृष्टीकोन नाशिकच्या पर्यटनवृद्धीला पूरक ठरत आहे. ठरणार आहे.

विकेंडसाठी नाशिकलाच पसंती का दिली जात आहे?

हो, तसा विचार होताना दिसतो. नाशिक हे असे ठिकाण आहे की ज्याचा सर्व बाजूंनी चांगला कनेक्ट आहे. तीसुद्धा नाशिकची एक विशेष गुणवत्ता यूएसपी आहे. नाशिक शहर मुंबई, पुणे, औरंगाबाद, सुरत, नागपूर, जळगाव आदी अनेक शहरांशी सहज कनेक्ट झाले आहे. आपल्याकडे विमानतळ आहे. येथून शिर्डी विमानतळाकडे जायला फक्त दीड तास लागतो. शिर्डी विमानतळाचा नीट विचार केला शिर्डीला जाताना कधीही वाहतुकीची जास्त वर्दळ लागत नाही. दीड तासात तेथे पोहोचता येते. मुंबईत अंधेरी होऊन विमानतळावर जायचे म्हटले तरी दोन तास आधी निघावे लागते, पण आपल्याकडे जास्त चांगली कनेक्टिव्हिटी आहे. त्याचा नीट विचार केला जात नाही.

विकेंड होम्सबद्दल माझी माहिती अशी आहे की, त्र्यंबकेश्वर, वैतरणा, इगतपुरी परिसरात सध्या एक हजार विकेंड बंगल्यांचे नवीन काम चालू आहे. जे जुने बंगले आहेत तेथे विकेंडला शुक्रवार ते रविवारी जागा मिळत नाही. ऑनलाईन जाऊन त्याची खातरजमा करता येईल. एक हजार नवीन बंगले पर्यटनसंधी पाहूनच होत आहेत. एकूणच भविष्यात नाशिकच्या पर्यटनाला चांगला वाव आहे. फक्त काळजी एकच! आपल्या शहराचे निसर्ग सौंदर्य, जलसंपदा व सुंदरता टिकवू शकलो तर शहराच्या पर्यटन विकासाला कोणीही थांबवणे शक्य नाही.

शब्दांकन : रवींद्र केडिया

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com