Video नंदुरबारकरांसाठी कोविड कोच रेल्वे, पाहा कशी असणार सुविधा

खा.डॉ.हीना गावित यांच्या प्रयत्नांना यश
Video नंदुरबारकरांसाठी कोविड कोच रेल्वे, पाहा कशी असणार सुविधा

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार जिल्हयात कोविडची भयंकर स्थिती निर्माण झाल्याने केंद्रीय रेल्वे व आरोग्य विभागातर्फे रेल्वे कोविड कोच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. २० कोचच्या या रेल्वेमध्ये प्रत्येकी १६ ते २४ बेडची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. सदर रेल्वे नंदुरबार रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म नंबर ३ वर दाखल झाली आहे.

याबाबत माहिती देतांना खा.डॉ.हीना गावित यांनी सांगितले, केंद्रीय रेल्वे व आरोग्य विभागाच्या वतीने जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये उपचारासाठी रेल्वे कोविड कोच पाठविण्यात येत आहे.

त्यानुसार आपण केंद्रीय आरोग्य मंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे रेल्वे कोच उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती, या पाठपुराव्याला यश आले आहे. नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर दि.११ एप्रिल २०२१ रोजी रेल्वे कोविड कोच आला असुन आज दि.१२ एप्रिलपासुन रुग्णांवर उपचारासाठी सदर कोच उपलब्ध झाली आहे.

मागील वर्षी देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला होता. वाढता प्रादुर्भाव घेता केंद्रीय आरोग्य मंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वे कोविड कोच वर्षभरापूर्वी तयार केल्या होत्या.

या रेल्वे कोविड कोच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत व तेथे वैद्यकीय सुविधा पुरविणे गरजेचे आहे, अशा ठिकाणी पाठविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

ही गंभिर परिस्थिती पाहता रुग्णांच्या उपचारासाठी खा. डॉ.हिना गावित यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून नंदुरबार जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे कोच उपचाराकरिता उपलब्ध व्हावी, असा पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्याला यश आले असून आज रोजी नंदुरबार येथील रेल्वे स्थानकाच्या प्लेटफार्म क्रमांक तीन याठिकाणी रेल्वेची कोविड कोच दाखल झाली आहे. या कोविड रेल्वेमध्ये वीस डबे असणार असून एका कोचमध्ये १६ ते २४ बेड असतील.

मच्छरदानीसह बाथरूम व दोन बायोटॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एका कोचमध्ये दोन ऑक्सिजन व कूलरची व्यवस्था असणार आहे. कोचमध्ये तीनशे ते चारशे रुग्ण कमी लक्षणे सदृश्य असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

सदरच्या रेल्वे कोचमध्ये नंदुरबार जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येईल. तसेच या कोचच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. ही रेल्वे आज दि.१२ एप्रिल २०२१ पासून रुग्णांच्या प्रत्यक्ष उपचारासाठी उपलब्ध होणार असल्याचे खा.डॉ.हिना गावित यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com