Video : खान्देश वासियांचे कुलदैवत श्रीक्षेत्र मनुदेवी

आज जागतिक पर्यटन दिन

चिंचोली |नितीन बडगुजर | Chincholi

वळणदार रस्ते, रस्त्यावर दोन्ही बाजूला उंच उंच टेकड्या, घनदाट सागवानी वृक्षे, दऱ्याखोऱ्या मधून वाहणारे लहान मोठे धबधबे, नाल्याखोल्यातून वाहणारे धबधब्याचे  झुळझळ पाणी, पक्षांचा किलबिलाट अशा निसर्गरम्य व मनमोहक वातावरणात जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) मनुदेवी (Manudevi) हे पर्यटन स्थळ आहे.  

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर यावल तालुक्यातील चिंचोली या गावाजवळ मनुदेवी फाटा आहे. चिंचोलीपासून साधारण दहा ते बारा कि मी.अंतरावर उत्तरेला सातपुडा पर्वताच्या डोंगराळ भागात खान्देश वासियांचे कुलदैवत श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिराची (Manudevi Temple) स्थापना करण्यात आली आहे.

श्रीक्षेत्र मनुदेवी हे एक निसर्ग रम्य स्थळ तर खान्देश वासियांचे कुलदैवत म्हणून ही महाराष्ट्रात ओळखले जाते. पंरतु या भागात श्रीक्षेत्राला जितके महत्व आहे. तितकेच येथील पर्यटन स्थळाला महत्व आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की याठिकाणी पर्यटक व भाविक अशी दोघांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. गेल्या दोन वर्षांपासुन महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळे कोरोना च्या महामारी मुळे बंद होती. पंरतु महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुले केल्याने निसर्ग रम्य ठिकाण सातपुडा मनुदेवी परीसर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी होत आहे.

धबधबा पर्यटकांचा आकर्षण

चिंचोली पासुनच सातपुडा पर्वत पर्वताचे दर्शन होते .तेथुन उत्तरेला जसेजसे पुढे जाल आडगाव व पुढे अगदी सातपुडयाच्या पायथ्याशी मनापुरी हे संपुर्ण आदिवासी समाजाचे एक टुमदार खेडे.खरं तर या मनापुरी गावा पासुनच पर्यटन स्थळाला प्रारंभ होतो. सातपुडा मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराच्या समोर अंदाजे 150 फूट उंचीवरुन कोसळणारा धबधबा आहे.

वर्षातील 6 ते 7 महिने कोसळणा-या या धबधब्याचे पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाझर तलावात येते. येथे शासनाच्या मदतीने पाझर तलाव बांधण्यात आला असुन त्याठिकाणी सातपुडा पर्वताच्या डोंगर द-या मधुन व मंदिरा समोरच कोसळणा-या धबधब्याचे पाणी हे याच तलावात जमा होते. त्यामुळे मनुदेवीचा परिसरात या तलावाच्या सौदर्याने अजुन नवी भर पडली आहे.

तिर्थक्षेत्राविषयी दंतकथा

या तिर्थक्षेत्राविषयी अनेक दंतकथा, लोककथा, तोंडी इतिहास आहे. देवी भागवत पुराणात असा उल्लेख आहे कि विष्णु ब्रम्हा महेश या देवांवर एक मोठे संकट आले असता, राक्षसांपासून सुटका करण्यासाठी या तिन्ही देवतांना गुप्त ठिकाणी म्हणजे सातपुडयाच्या खोल दरीत गुहेत येऊन बसले. ते गुप्त ठिकाण म्हणजे श्री मनुदेवीचे मंदिर होय. सर्व देवांनी मनाने एक विचार करीत असता, लपलेल्या गुहेत श्वासाने उच्छवासाने एक तेज प्रकट झाले.

ती तीव्र तेजस्वी प्रकाशाची ज्योत निर्माण झाली, तो सर्व शक्तीमान प्रकाशाचे देवता मनाचे सामर्थ्य असलेली श्री मनुदेवी प्रकट झाली. तीच मनुदेवी देवांजवळ प्रकट झाल्याने, कोणत्या हेतूने आपण आला आहात, त्यावेळी ब्रम्हा विष्णु महेशांनी देवीस विनंती केली की, हे आदिशक्ती, सर्वमान शक्ती श्री मनुदेवी आमच्यावर फार मोठे संकट कोसळलेले आहे.

म्हैषासूर राक्षसाने पॄथ्वीवर सर्वत्र धुमाकूळ, अत्याचार सुरु केल्याने आम्हाला हैराण त्रस्त केलेले आहे. म्हणून त्याचा वध करण्यासाठी तू उग्र रूप धारण करुन त्याचा नि:पात करावा. त्यास नष्ट करावे व सर्व जीव सॄष्टीला भय मूक्त करावे. ही सर्व शक्तीची प्रार्थना एकून श्रीमनुदेवी देवांना अभयवचन दिले की, मी लवकरच श्री सप्तश्रॄंग देवीचा अवतार घेऊन, येथूनच धावत जाऊन त्या महिषासुर राक्षसाचा वध करेल.

या अभिवचनानुसार श्रीमनुदेवी ही महिषासुर सैन्याचा वध करीत तापी काठावर वसलेले शिरागड येथे युध्द केले. म्हणून त्या ठिकाणी श्रीमनुदेवीचे स्वरूप शिरागडची अष्टभुजा देवी म्हणून आजही विराजमान आहे. तेथून श्रीमनुदेवीने नांद्रा ( बाजारा ) येथे युध्द केले तेथे ही अष्टभुजादेवीचे मंदिर आहे. नांद्रा येथून पाटणा या ठिकाणी घनघोर युध्द झाल्याने देवीने तेथे विश्रांती घेतलेली आहे. म्हणून श्री पाटणा देवी येथे श्री श्रीमनुदेवीचे स्वरुप अष्टभुजा देवीच्या सुंदर स्वरुपात प्रकट झालेली असून जागॄत ठिकाण झालेले आहे.

तेथूनच श्री मनुदेवीने महिषासुर राक्षसाचा वध सप्तश्रॄंग पर्वतात केल्याने दुर्गम अशा ठिकाणी श्री सप्तश्रॄंग देवीने उग्र स्वरूप धारन करून त्या महाभयंकर राक्षस महिषासुराचा सतत ७ वर्षे घनघोर युध्द करून त्यास नष्ट केलेले आहे. तीच आदिशक्ती म्हणजे श्री सप्तश्रॄंगदेवीचे माहेर हे खानदेश म्हणून सांगतात म्हणजेच सातपुडा निवासिनी श्री मनुदेवीचे स्वरूप होय. अशी ऐकिवात येणारी कथा आहे.

श्री मनुदेवी एक शक्तीपीठ

ज्या भाविकांना स्त्री पुत्र द्रव्यादी गोष्टी प्राप्त करून घेण्याची इच्छा असते, त्यांना उत्तम प्रकारे तोषविणारी, भक्तांकडून पूजा-अर्चा भक्तीपूर्वक करविणारी तूच, तूच इच्छीत वर देतेस, तू यशोदेच्या उदरी अवतार घेतल्यास भाविक तुझी धूप-दीप, नैवैदय, नमस्कार या सामग्रीच्या योगाने पूजा करतील, पॄथ्वीवर लोक तुझी मंदिरे बांधतील.

दुर्गा, कुमुदा, चंडिका, कॄष्णा, माधवी, कन्याका, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका, भद्रकाली, विजया आणि वैष्णवी अशा नावांनी तुझी मंदिरे-ठिकाणे प्रसिध्द होतील. परंतू मनाची सूप्त इच्छा पुर्ण करणारी, मनातील हेतू पुर्ण करणारी असंख्य भक्त-उपासकांची कुलस्वामिनी श्री मनुदेवी सातपुडा पर्वतात निवास करेल असे श्रीकॄष्णांनी म्हटले होते, अशी आख्यायिका आहे.

मंदिराचा निसर्गरम्य परिसर

मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराच्या समोर अंदाजे 400 फूट उंचीवरुन कोसळणारा धबधबा आहे. वर्षातील 6 ते 7 महिने कोसळणारया या धबधब्याचे पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी येते. येथे शासनाच्या मदतीने पाझर तलाव बांधण्यात आहे. तलावाशेजारीच छोटेशे सुंदर हनुमानाचे मंदिर आहे.

त्यामुळे मनुदेवीचा परिसर रमणीय व मनमोहक असा झाला आहे. तसेच येथे भाविंकाबरोबर पर्यटक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सहली मोठ्या संखेने येत असतात. या तिर्थक्षेत्राचा पर्यटन स्थळ म्हणूनही विकास व्हावा अशी अपेक्षा भाविंकाकडून व विश्वस्त मंडळाकडून महाराष्ट्र शासनाकडे व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com