Friday, April 26, 2024
HomeनगरVIDEO : प्रतिकूल परिस्थितीच प्रेरणा ठरते!

VIDEO : प्रतिकूल परिस्थितीच प्रेरणा ठरते!

अहमदनगर (प्रतिनिधी)-

संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतो. त्यामुळे खचून जायचे नसते. त्यास धाडसाने सामोरे जायला हवे. प्रतिकूल परिस्थितीच आपल्यासाठी प्रेरणा ठरते. फक्त या परिस्थितीचा सामना सकारात्मक विचारांनी करायला हवा, अशी मांडणी करत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी सार्वमत-देशदूत वेब व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफले.

- Advertisement -

प्राथमिक शिक्षिका ते परीक्षा मंडळाच्या अध्यक्षा असा प्रवास त्यांनी उलगडला. या प्रवासातील चांगले-वाईट अनुभव, प्रत्येकवेळी संकटाला तोंड देण्याची तयारी, कुटुंब व सहकर्‍यांकडून झालेली मदत अशा अनेक अंगांनी त्यांनी आपली वाटचाल उभी केली. लहानपणी एक मुलगी म्हणून शिक्षण घेत असताना भेटलेली मोठ्या विचारांची माणसे, पुस्तक वाचण्याची आणि शिकण्याची जिद्द या सवयींमुळे एका सामान्य घरातील मुलीने शिक्षिका ते शिक्षण मंडळाची अध्यक्ष असा प्रवास केला.

संकटे अनेक आली. पण थांबायचे नाही, हे निश्चित केले होते. शिक्षण सुरू असताना अंगावर आलेली संसाराची जबाबदारी. ती जबाबदारी पार पाडत असताना शिक्षण आणि स्वत:ला सिद्ध करण्याची ओढ, यामुळे सतत हातून काहीतरी घडत गेले. संघर्ष करत असताना स्वत:वरचा विश्वास कधीही कमी होणार नाही, हे कटाक्षाने पाळायला हवे. ‘जिंदगी जीने का मकसद खास होना चाहिये और अपने आप पे विश्वास होना चाहिये’ या ओळीतून त्यांनी आपल्या संघर्षाचे तत्वज्ञान स्पष्ट केले.

प्रारंभी शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी त्यांचा परिचय करून दिला. दररोज सायंकाळी 7 वाजता वेब व्याख्यानमाला ऑनलाईन प्रसारित होत आहे.

‘संगीत आणि आरोग्य’

शुक्रवार, 28 मे रोजी निसर्गोपचार तज्ज्ञ व संगीत चिकित्सक म्हणून प्रसिद्ध डॉ.संतोष बोराडे हे ‘संगीत आणि आरोग्य’ या विषयावर पाचवे पुष्प गुंफणार आहेत. आनंद, अध्यात्म आणि आरोग्याचा त्रिवेणी अभ्यास कलांच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांत पोहचविण्याचे कार्य ते यशस्वीपणे पार पाडत आहेत. ‘जीवनसंगीत’ हा त्यांचा कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला आहे.

वाचक-रसिकांसाठी या वेब व्याख्यानमालेचे ऑनलाईन प्रसारण सार्वमतच्या www.deshdoot.com या संकेतस्थळासह युट्यूबचे deshdoot या चॅनलवर दररोज सायंकाळी 7 वाजता होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या