विनोबा आपल्या आजूबाजूला, शोधण्याची दृष्टी हवी!

सार्वमत-देशदूत वेब व्याख्यानमाला : डॉ.गणेश राऊत यांनी गुंफले तिसरे पुष्प

अहमदनगर (प्रतिनिधी)-

आजही विचारांनी विनोबा आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांना शोधण्याची दृष्टी आपल्यात हवी. डोळे उडघे ठेवून पहायला हवे. वर्तमानात भूदान, अन्नदान, धान्यदान, समयदान, संपत्तीदान असे कुठलेही दान करोनाच्या काळात करता येणे शक्य आहे. या देशाला दानाची मोठी परंपरा आहे. दान करावे, अन्यथा नादान होण्याचा धोका आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.गणेश राऊत यांनी केले.

सार्वमत-देशदूत आयोजित वेब व्याख्यानमालेत बुधवारी पुणे येथील देसाई महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख, प्राचार्य डॉ.राऊत यांनी ‘विनोबा’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. ते म्हणाले, आचार्य विनोबांनी आपल्याला नवी दृष्टी दिली. तरूणपणीच त्यांनी संन्यासाची इच्छा व्यक्त केली. आपली सर्व शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळून टाकली. पुन्हा या प्रमाणपत्रांकडे पाहून नोकरी करण्याचा मोह होता कामा नये, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. त्याग हाच त्यांच्या जीवनाचा मुलाधार राहिला. मिळालेली सर्व संपत्ती त्यांनी आपल्या चळवळीसाठी देणगी म्हणून देवून टाकली. पुढे त्यांनी गृहत्याग केला.

महात्मा गांधी आणि विनोबांच्या भेटीचा प्रसंग सांगताना डॉ.राऊत म्हणाले, 7 जून 1916 या दिवशी दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. विनोबा साबरमती आश्रमात महात्मा गांधींना भेटण्यासाठी गेले. तिथे एक गृहस्थ भाजी चिरत बसले होते. त्यांनी विनोबांना विचारले, तुमची भेटीची वेळ काय ठरली? विनोबांनी उत्तर दिले, 10 वाजता. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, आता वाजलेत 9.57 तेव्हा 10 वाजता मिस्टर गांधी तुम्हाला भेटतील. बरोबर 10च्या ठोक्याला भाजी चिरणारा गृहस्थ हात स्वच्छ करत म्हणाला, मीच मिस्टर गांधी. यावर विनोबांधी अस लिहून ठेवलयं, ‘राष्ट्रनेता भाजी चिरू शकतो. हे मी कधी पाहिले नव्हते. माझ्यावर त्यावेळी जो संस्कार झाला, तो मी विसरू शकत नाही...अशा प्रसंगातून विनोबांच्या जीवनप्रवासाची मांडणी त्यांनी केली.

यावेळी चळवळीत सक्रीय झालेले विनोबा, फैजपुरचं काँग्रेस अधिवेशन, देशभरातील आणि काही शेजारी राष्ट्रातील भूदान चळवळ अशा अनेक अंगाने विनोबांचे कार्य डॉ.राऊत यांनी उलगडून दाखविले. प्रारंभी शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी त्यांचा परिचय करून दिला. 30 मेपर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता वेब व्याख्यानमाला ऑनलाईन प्रसारित होणार आहे.

‘मी अशी घडले’

गुरुवार, 27 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे या ‘मी अशी घडले’ या विषयावर चौथे पुष्प गुंफणार आहेत. प्राथमिक शिक्षिका ते परीक्षा मंडळाच्या अध्यक्षा असा प्रवास त्यांनी केला आहे. शिक्षण पद्धतीला दिशा देण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. ‘ग्रामीण कादंबरीतील स्त्री’ या पुस्तकासह ‘स्पंदन मनाची’ हा काव्यसंग्रह व शोधताना स्वत:ला हा चारोळी संग्रह प्रकाशित आहे.

वाचक-रसिकांसाठी या वेब-व्याख्यानमालेचे ऑनलाईन प्रक्षेपण www.deshdoot.com या संकेतस्थळासह युट्यूबचे deshdoot या चॅनलवर दररोज सायंकाळी 7 वाजता होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com