Video : सततचे अपघात, चालत्या वाहनांचे फुटतायेत टायर्स; कोटंबी, सावळघाट बनतोय मृत्यूचा सापळा
नाशिक | Nashik
पेठ तालुक्यातील (Peth Taluka) नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील (Nashik to Gujarat National Highway) कोटंबी आणि सावळघाट (Kotambi and Sawalghat) हा वळणाचा रस्ता मृत्यूचा (Death) सापळा बनला असून याठिकाणी सतत अपघाताच्या घटना घडतात. काही वर्षांपूर्वीच या महामार्गाच्या (Highway) नूतनीकरणाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे वाहनधारकांचा प्रवास सुखकर झाला. मात्र, प्रवास जरी सुखकर झाला असला तरी कोटंबी आणि सावळघाट या वळणाच्या रस्त्यावर अपघाताच्या घटना आजही घडत असून हा वळणाचा रस्ता अजून किती लोकांचा जीव घेणार? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे...
नाशिक ते पेठ (Nashik to Peth) हा राष्ट्रीय महामार्ग गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, वापी, दमण, दादरा, नगरहवेली, सेल्वास, सुरत, अहमदाबाद शहरातील औद्योगिक वसाहतीमधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक (Heavy Traffic) होत असते. तसेच हा रस्ता मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडला गेल्याने लहान-मोठ्या खासगी वाहनांची या रस्त्याने वर्दळ वाढली आहे. तसेच नाशिक-पेठ रस्त्यावर रासेगाव, उमराळे, चाचडगाव, करंजाळी, कोटंबी, पेठ, वांगणी आदी गावे आहेत. तर करंजाळी व पेठ या दोन्ही ठिकाणी बाजारपेठा असल्याने नागरिकांची (Citizens) मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
कोटंबी आणि सावळघाटातील अवघड वळणावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात. त्यामुळे अपघाताचा हा संभाव्य धोका लक्षात घेऊन दोन्ही घाटामध्ये दिशादर्शक फलक लावण्याची मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अनेकदा दिशादर्शक फलक नसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नव्या वाहनचालकांचा रस्ता चुकल्याचेही प्रकार घडत असतात. त्यामुळे या प्रकाराला देखील आळा बसू शकेल.
दरम्यान, येथील स्थानिकांनी सांगितले की, एका वर्षात सुमारे ३३ मृत्यू या अपघाताच्या वळणावर झाले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. याशिवाय स्थानिक रहिवाशांनी पेठ तालुका कृती समिती (Peth Taluka Action Committee) स्थापन करत या महामार्गाचा विषय हाताळला. तसेच येथील स्थानिक रहिवासी यशवंत गावंडे यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण देखील केले. त्यानंतर त्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी आश्वासन दिले की, या महामार्गाचे सर्वेक्षण होईल. यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण (Hunger Strike) मागे घेतले. त्यामुळे आता या महामार्गाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण कधी होणार? याकडे स्थानिकांच्या नजरा लागल्या आहेत.