अतिवृष्टीने शेतकरी संकटात
व्हिडिओ स्टोरी

अतिवृष्टीने शेतकरी संकटात

लॉकडाऊनमुळे पिकविलेल्या मालाला बाजार भावही मिळत नाही

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

शहरासह तालुक्यात सलग दोन दिवस मोठया प्रमाणात झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीचा फटका अनेक गावांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे lockdown पिकविलेल्या मालाला बाजार भावही मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच विवंचनेत होता. अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून पिके उभी केली. परंतु या पावसाने शेतातील उभी पिके लोळवली आणि शेतकरी हवालदिल झाला आहे.

दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक दिवसांनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्यातील सोयाबीन, मका, पेरूच्या बागा, डांळीबांच्या बागा, कांदा, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील शिंगणापूर, खर्डी गणेश , पोहेगाव, सोनेवाडी, मढी बु., चांदेकसारे, देर्डे चांदवड, देर्डे को-हाळे, हंडेवाडी, कारवाडी, वेळापूर, सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, रांजणगांव देशमुख, अंजनापुर, डाऊच, धारणगाव आदी गावांमध्ये मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीपिकाबरोबरच घरात पाणी घुसून पडझड झाली तर विहीरींचेही नुकसान झाले आहे.

रात्री बंद झालेल्या पावसाचे आज सकाळी पुन्हा थोडे आगमन झाले असून सकाळपासून ढगाळ वातावरण असून आज पुन्हा पावसाची शक्यता आहे. शिंगणापूर व खर्डी गणेश येथील चंद्रकांत राऊत यांच्या पेरू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच विलास लक्ष्मण चांदर, अनिकेत राजाराम चांदर, चंद्रभान भीकजी चांदर, पोपटराव गायकवाड , संगीता अशोक चांदर, बाबुराव विठ्ठल चांदर, राऊत शूलकेश्वर नारायण, संजय राऊत, राजेंद्र राऊत, चंद्रकांत राऊत याचे देखील मका व सोयाबीन या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील शेतकरी करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com