Thursday, April 25, 2024
HomeजळगावVideo पिंपळगाव हरेश्वर येथील ‘हरीहरेश्वर मंदिर’ एक प्राचीन तपोभुमी

Video पिंपळगाव हरेश्वर येथील ‘हरीहरेश्वर मंदिर’ एक प्राचीन तपोभुमी

दिपक मुलमुले

पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा – Pimpalgaon Hareshwar

- Advertisement -

जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे बहुळा व डुब्बा या नद्यांचा संगम ही प्राचीन तपोभुमी असल्याचे उल्लेख अनेक पुराणात आढळून येतो, याठिकाणी पुरातकालीन ‘हरीहरेश्वर महादेव मंदिर’ (Harihareshwar Mahadev Temple) हे असून याठिकाणचा उल्लेख स्कंदपुराण, नवनाथ, शिवपुराण, शिवलीलामृत, श्रीमत भागवत पुराण आदि प्राचीन ग्रंथात वाचायला मिळतो.

प्रभु श्रीराम (Shriram) आपल्या वडिलांचे म्हणजे राजा दशरथाचे उत्तरकार्य नाशिक येथून आटोपून पुढच्या प्रवासाला निघाले असता वाटेत पिंपळगाव हरेश्वर या गावी बहुळा व डुब्बा या नद्यांच्या संगमावर भगवान शंकर येथे तपश्चर्या करीत असता, भगवान शंकर व प्रभु श्रीराम यांची भेट याच ठिकाणी झाली.

प्रभु श्रीराम हे विष्णुचा अवतार असल्याने, विष्णु व शंकर यांच्यामुळे ही जागा हरिहर म्हणून दोघांच्या नावाने ओळखली जाते. ही सर्व पुराणे संस्कृत मध्ये लिहली गेली असल्याने पुराणात या गावचा उल्लेख ‘पिप्पलग्राम हरिहरेश्वर’ असा आढळतो.

भस्मासूर भस्म झाला

या ठिकाणचा दूसरा उल्लेख हा ‘भस्मासुर भस्म झाला ती जागा’ म्हणून येतो. भगवान शकरांच्या ‘तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जागेवर भस्म होईल अश्या’ वरदानाचा चुकीचा उपयोग करणाऱ्या भस्मासुराला भगवान विष्णुने मोहिनीचे रूप घेऊन स्वत:च्या डोक्यावर हात ठेवायला भाग पाडले व भस्म केले.

म्हणून ‘भस्मासुराचा वध झाला ती जागा’ या ठिकाणचा असा उल्लेख पुराणात येतो. त्याचं प्रतिक म्हणून येथे ‘भस्मासुराची शिळा’ आहे.

यादव राजा महादेव (इ.स.1261-1270) आणि रामचंद्र (1271-1311) यांच्या कारकिर्दीत हेमाद्री किंवा हेमाडपंत हा मुख्ख्य प्रधान होता. त्याने खानदेशातील अनेक शिवमंदीराच्या रचनेला प्रोत्साहन दिले. त्याच्या नावावरून ही मंदिरे हेमाडपंथी देवालये म्हणून ओळखली जातात.

साधे सपाट बाह्यांग, फुलांच्या नक्षीचा वारेमाप वापर आणि आकृती शिल्पांचा अभाव ही यादवकालीन स्थापत्याची वैशिष्टे आहेत. पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वराचे मंदिर 1297 ला बांधले असं वर्णन हेनरी कोसेन्स या इंग्रज प्रवाशानं लिहून ठेवलं आहे.

पिंपळगावच्या पूर्वेस 1 किमी अंतरावर, बहूळा व डुब्बा या नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर हेमाडपंथी असून नागर या मुख्ख्य शैलीतील भूमीज या उपशैलीत बांधण्यात आले आहे.

पूर्वीच्या काळी सदर मंदिराच्या दिवाबत्तीचा खर्च जौखेडा गावाच्या महसूलातून केला जात असे. मात्र हे जौखेडा गाव 1800 ते 1850 दरम्यान ओसाड झाले.

मंदिराचा तालविन्यास (रचना)

चार मोठाल्या पायऱ्या चढून गेल्यावर प्रवेशद्वार आहे. ज्याच्या ललाटबिंबावर साध्या फुलांचे नक्षीकाम केले आहे. आत प्रवेश केल्यावर खुला मंडप लागतो. डाव्या हाताला गूढ़ मंडप (बंदिस्त खोली) लागतो जो पेशव्यांच्या काळात बांधला गेला असावा असे बांधकामावरून वाटते.

पुढे गेल्यावर उजव्या बाजुला गणितज्ञ भास्कराचार्य व त्यांची मुलगी लीलावती यांच्या समाध्या आहेत. (भास्कराचार्याचा मृत्यू नेमका कधी व कुठे झाला याबाबत इतिहास अभ्यासकात मतभेद आहेत.) तिथून थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजुला नंदी असलेला वाहनमंडप आहे जो 8 खांबावर पेलला आहे. याच्या बरोबर समोर मुख्ख्य मंडप आहे, जो 14 खांबावर पेलला आहे.

प्रकाशयोजनेसाठी गवाक्ष

मुख्य मंडपात प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या वर प्रकाशयोजनेसाठी गवाक्ष आहे. ज्यातून वर्षातून दोन दिवस सुर्याचा प्रकाश पूर्ण पींडीवर पडतो. नंतर मंडप व गाभारा यांना जोडणारा अंतराळ आहे. ज्यात उजव्या हाताला गणपतीची मुर्ती व छपराकड़ील बाजुस 3 दगडी चाके (चौरस) आहेत, ज्यातली 2 चाके कालौघात तुटून पडली आहेत. तसेच साधे नक्षीकाम आहे व सरतेशेवटी गर्भगृहात 6 पायऱ्या उतरून आत जावे लागते, ज्याला पाताळलिंगी माहादेव म्हणतात व आतमध्ये महादेवाची पींड आहे.

वेगळेपण म्हणजे पींडीच्या सुळक्यावर एक दुभाजक रेषा आहे; जी विष्णू व शंकार दोघांचे प्रतिनिधित्व करते. भगवान विष्णू असल्यामुळेच की काय गर्भगृहाच्या बाहेरील बाजुस सीतामातेचं प्रतिनिधित्व करणारी मूर्ती कोरली आहे.

हरीहरेश्वर –

शंकराचार्याँनी शिव, विष्णू, गणेश, आदित्य आणि देवी या पाच मुख्ख्य देवतांच्या भक्तांमधील वाद कमी करण्यासाठी ही पाचही दैवत एकच आहेत असं सांगुन एकत्वाची चळवळ सुरु केली. सातव्या शतकापासून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. त्यामुळे पुढे जाऊन शिव, विष्णू आणि गणेशाची त्रिदल, नंतर शिव व विष्णूची द्विगर्भगृही व त्यानंतर शिव व विष्णू मिळून हरिहर नामक एकच गर्भगृह असलेली मंदिरे बांधण्यात आली. पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वराचे मंदिरही याच चळवळीचा भाग आहे.

भस्मासुर-

मंदिराच्या मुख्ख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या हाताला एक शिळा आहे. गोधनाच्या किंवा गावाच्या संरक्षणासाठी मृत्यूमुखी पडलेल्या वीराबरोबर त्याची पत्नी काही वेळा सती जात होती. तिच्या पतिव्रतेच्या स्मरणार्थ शिळा उभारीत; पण पिंपळगावातली शिळा ही सतीशिळा नाही. तशी ही वीरगळही नाही, वीरगळेवर कोरीवकामाची विशिष्ट पद्धत होती, तसे काही या शिळेवर दिसत नाही. दंतकथेप्रमाणे ही शिळा भस्मासुराची असल्याचे सांगण्यात येते. आंब्याच्या झाड़ाच्या खोडाला लागुन अजुन एक शिळा आहे. अध्यात्मिक कारणांसाठी मृत्यूला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीच्या स्मरणार्थही स्मारकशिळा उभारीत ही याच प्रकारातील शिळा आहे.

शिलालेख –

मंदिराच्या दुसऱ्या पायरीवर इ.स 1919 सालचा 15 मीटर 9 इंचाचा मराठी भाषेतला शिलालेख कोरलेला आहे. श्रीलंका येथील शिलालेखाला जगातील सर्वाधिक लांबीचा शिलालेख म्हणून ओळखले जाते; जो 9 मीटर लांबीचा आहे. तरी प्रयत्न केल्यास ‘जगातील सर्वाधिक लांबीचा’ म्हणून पिंपळगावच्या शिलालेखाची ओळख होऊ शकते यात शंका नाही.

इतर अवशेष – मंदिराच्या संरक्षण भिंतीचे खोदकाम करताना एक महादेवाची पींड असलेला दगडी चौथरा सापडला. हा चौथरा म्हणजे येथील जुन्या मंदिराचे अवशेष असावे. गावातल्या काही लोकांनी 4-5 वर्षापूर्वी मंदिरातला एक चौथरा तोडला. त्यात खांबाचे जूने अवशेष सापडले. त्यामुळे येथे जुने मंदिर असावे व त्याच मंदिराचा जीर्णोद्धार करून आताचे मंदिर बांधले असावे या अंदाजाला बळ मिळते.

सहाव्या-सातव्या शतकात चालुक्यांचे मांडलिक निकुंभ राजे यांनी मंदिराच्या बांधकामाला प्रोत्साहन दिले होते. या भागावर त्यांची सत्ता होती त्यांनी येथे मंदिर बांधल्याची शक्यता आहे.

पिंपळगावातील हरिहरेश्वराचे मंदिर 13 व्या शतकाच्या शेवटाचे आहे. 250-300 वर्षापूर्वी चळवळीला यश मिळाल्यावरही पुन्हा याच आधारावर दोन देवांचे मिळून एकच मंदिर बांधण्यात आले, असे का असावे? भारतातल्या पहिल्यावहिल्या मंदिरांच्या स्वरुपाचे जसे वर्णन आढळते त्या वर्णनाशी तंतोतंत जुळणारा हा चौथरा आहे. C14 पद्धतीने त्याचा कालावधी काढल्यास खानदेशाला त्याच्या सर्वात पहिल्या मंदिराचा शोध लागेल यात शंका नाही.

यात्रा – 1824 मध्ये तत्कालीन खानदेशचा collector राँबर्टसन याने विल्यम चँपलीनला खानदेशात भरणाऱ्या यात्रांविषयी माहिती कळविली होती. त्यात पिंपळगावच्या यात्रेचा उल्लेख नव्हता. पण 1870 साली येथे यात्रा भरत असल्याचा Gazetteer मध्ये उल्लेख आहे. अगोदर उल्लेख नसण्याचे कारण, हा भाग दुर्लक्षित होता. ही यात्रा खूप वर्षापासून येथे भरत आहे एव्हढे नक्की. सलग 15 दिवस भरणारी मसाल्यांची यात्रा अशी या यात्रेची ख्याती होती. 7-8 तमाशे पंधरा दिवस येथे तळ ठोकून असायचे.

- Advertisment -

ताज्या बातम्या