व्हिडीओ स्टोरी : द्राक्ष, डाळिंब, कांद्याला फटका

ढगाळ वातावरणाचा परिणाम
व्हिडीओ स्टोरी : द्राक्ष, डाळिंब, कांद्याला फटका

नाशिक । Nashik

मागील वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना केल्यानंतर याहीवर्षी नुकसानीचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. शुक्रवार(दि.११)पासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाची रिमझिम होत आहे.

यामुळे तयार झालेल्या गारठ्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. द्राक्षाबरोबरच काढणीला आलेला कांदा, डाळिंब बागांनाही या वातावरणाचा फटका बसला आहे.

बदललेल्या वातावरणामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी फवारणीचा खर्च द्राक्ष व डाळिंब उत्पादकांना सोसावा लागत आहे. काही द्राक्षबागांचे घड पाणी उतरण्याच्या स्थितीत आहेत. मात्र,वातावरण बदलामुळे या घडांना तडे जाण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात मंगळवार (दि. १५) नंतर वातावरण निवळेल, अशी शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे द्राक्ष व डाळिंब उत्पादकांना यातून काहीसा दिलासा मिळेल, असे चित्र आहे. सिंचन व्यवस्थापन जास्तीचे दिल्यास ढगाळ वातावरणात नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन केल्यास नत्र स्थिर राहून तडे जाण्याची समस्या कमी होईल, सर्व सल द्राक्ष तज्ञांकडून देण्यात येत आहे. ढगाळ वातावरणाने द्राक्ष बागांमध्ये भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

या वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच डाळिंबावर मावा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता औषधाचा अतिरिक्त खर्च वाढणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com