त्र्यंबक रोडवर उसळला वारकऱ्यांचा जनसागर; 'पाहा' व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संत निवृत्तीनाथांच्या यात्रेनिमित्त (Sant Nivruttinath Yatra) राज्यभरातून विविध भागातील दिंड्यांचे शहरात आगमन सुरू झाले आहे. त्र्यंबकेश्वरकडे (Trimbakeshwar) जाणाऱ्या नाशिक त्रंबकेश्वर मार्गावर त्यामुळे भक्ती मेळावाच रंगला आहे. ठिकठिकाणी दिंड्यांच्या स्वागतासाठी दिंड्यांच्या सोयीसेवेसाठी पेंडॉल उभारले गेलेले आहेत. त्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी नाशिककरांनी पटकावली आहे...

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु म्हणून ओळख असणारे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या यात्रेसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून दिंड्या शहरात येत असतात. दरवर्षी साधारणतः साडेचारशे ते पाचशे दिंड्या या सोहळ्यासाठी येत असतात. त्यानिमित्ताने नाशिक त्रंबकेश्वर मार्गावर भक्तीमय वातावरण निर्माण झालेले आहे.

नाशिक शहरातील त्रंबक नाक्यापासूनच वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांना सेवा देण्यासाठी विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने सुंदर कांड सेवा, सत्संग मायको फोरम निळकंठ पाटील, गजानन महाराज सेवा संस्थान अशा विविध संस्थांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा अन्नदान अल्पोपहार, चहापान पीएचएल याच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अनेक ठिकाणी वडे, जिलेबी नाश्ता दिला जात आहे. काही ठिकाणी पोहे, उपमा दिले जात आहेत. काही ठिकाणी उपवासाचा फराळ, केळी वाटप केले जात आहे. पाण्याचे टँकर उभे करून वारकऱ्यांना पाण्याची जल व्यवस्था केली जात आहे. शेकडो किलोमीटर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना विविध त्रास जाणवत असल्याने व हवा बदल, पाणी बदल होत असल्यामुळे त्यांना जाणवणाऱ्या संसर्गजन्य आजारातून उपचार करण्यासाठी विविध वैद्यकीय स्टॉल्सदेखील उभारण्यात आले आहेत.

नाशिक जिल्हा वारकरी संप्रदायाच्या महामंडळाच्या वतीने पहिल्यांदा वारकरी दिंड्यांचे स्वागत केले जात आहे. येणाऱ्या संत माणसांच्या हेतूची सत्कार करण्याची परंपरा जिल्हा वारकरी संप्रदायाच्या महामंडळाने केली आहे.

जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण अण्णा महाराज हिसवळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकाऱ्यांनी शहरात दाखल होणाऱ्या दिंड्यांचे त्यासोबत असणाऱ्या संत माणसांचा यशोचित सत्कार करून एक नवी परंपरा रूढ केली आहे.

याबाबत बोलताना अण्णा महाराज हिसवळकर यांनी शहरात दाखल होताना त्यांचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य असून संतांचे पूजन करणे ही आपली परंपरा असल्याने हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. या माध्यमातून संत परंपरांचे स्वागत करण्याची नवी परंपरा रूढ होणार असल्याचे वारकरी मंडळाकडून सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com