देशदूत पर्यटन विशेष : कृषी पर्यटनाला जिल्ह्यात अनुकूल वातावरण

देशदूत पर्यटन विशेष : कृषी पर्यटनाला जिल्ह्यात अनुकूल वातावरण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शेती आणि पर्यटन (Agriculture and Tourism ) या दोन संकल्पना जोडणारा दुवा म्हणजे कृषी पर्यटन( Agritourism) होय. नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा आहे. ही उपलब्धी कृषी पर्यटनासाठी अनुकूल आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याला बऱ्याच संधी आहेत. योग्य ते प्रयत्न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला सुगीचे दिवस येतील, असा आशावाद पेठ तालुक्यातील गावंधपाडाचे प्रगतीशील शेतकरी आणि वनराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत गावंडे (Yashwant Gawande, President of Vanraj Farmers Producer Company ) यांनी व्यक्त केला. गावंडे त्यांच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.

'देशदूत पर्यटन विशेष' मालिकेत संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी गावंडे यांची मुलाखत घेतली. यावेळी गावंडे यांनी जिल्ह्यातील कृषी पर्यटनाची स्थिती आणि भविष्यातील संधींबाबत आपली मते मांडली.

* पेठ, सुरगाणा, हरसूल, त्र्यंबकेश्वरचा परिसर शेतीच्या बाबतीत संपन्न परिसर आहे. या परिसरात कृषी पर्यटनाला किती वाव आहे?

- पेठ, सुरगाणा, त्र्यंबक हे तालुके कृषी क्षेत्रात प्रगत आहेत. नाशिकपासून तिन्ही तालुके जवळ आहेत. मात्र पर्यटकांना कृषी क्षेत्राची ताकद आणि खरी ओळख अजून पटलेली नाही. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकमध्ये अनेक ठिकाणी शेतीशी निगडीत पर्यटनस्थळे होऊ शकतात. मात्र ही तालुके मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

पेठच्या बाबतीत बोलायचे तर येथे जी उत्पादने होतात ती इतरत्र कुठे होत नाहीत. इंद्रायणी, दप्तरी, ब्लॅक राईस, रेड राईस, नागली, वरई अशी अनेक अन्नधान्ये पेठमध्ये होतात. ही उत्पादने पाहण्यासाठी, त्यांची चव चाखण्यासाठी व पेठ परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी कृषी पर्यटनाला चांगली संधी आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी आता पर्यटनासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन कृषी पर्यटनाला पर्यटकांनी साथ देणे गरजेचे आहे. पर्यटनाला चालना मिळाली तर आणखी लोकांना व्यवसाय उभारता येतील. यामुळे परिसराची उन्नती होईल. रोजगारासाठी होणारे परिसरातील लोकांचे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल.

* पेठ परिसरात पर्यटकांना कृषी पर्यटनाचा अनुभव घ्यावासा वाटल्यास तो कसा मिळवून देता येईल?

- मी करंजाळी परिसरातील श्रीमंत धरणालगत वास्तव्यास आहे. परिसरात धरण बांधण्याअगोदर एकही झाड नव्हते. धरण बांधण्यात आले तर परिसराचा कायापालट होईल, असे माझ्या लक्षात आले. त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. काही वर्षांच्या लढ्याला यश आले आणि धरण बांधण्यात आले. येथील धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धरण होण्याआधी परिसरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत होते.

शेतकरी भात पिकाची पेरणी करून उदरनिर्वाहासाठी शहराकडे स्थलांतर करीत. मात्र धरण झाल्यानंतर परिस्थिती पालटली आहे. रोजगारासाठी होणारे स्थलांतर काही प्रमाणात थांबले आहे. आज येथील शेतकरी बागायतदार झाले आहेत. म्हणून येथील धरणाला 'श्रीमंत धरण' असे नाव पडले आहे. धरणात बोटिंगसारखे खेळ खेळले जाऊ शकतात. धरणालगतची मोठमोठी झाडे शांततेची अनुभूती देतात. आदिवासींच्या पारंपरिक जेवणाचा आनंद पर्यटकांना घेता येऊ शकतो. येथे पिकणाऱ्या आंब्यापैकी जवळपास ५० टक्के आंबा परदेशात

निर्यात केला जातो. फणस, जांभूळ, बोर, पेरू, चिंच यांसारख्या अनेक फळांचे उत्पादन पेठ परिसरात होते. येथे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. शहरात राहणाऱ्या माणसाला फक्त विकायला आलेली फळेच पाहता येतात. येथील परिसरात झाडांवरील फळांचा अनुभवसुद्धा लोकांना घेता येऊ शकतो. वनसंपदेची ओळख त्यांना होऊ शकते. एकंदरीत कृषी क्षेत्राचा सुंदर अनुभव पर्यटकांना लुटता येऊ शकतो.

* तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करता का?

- होय. यासाठी मी एक कंपनी स्थापन केली आहे. कंपनीचे सहाशेहून अधिक सभासद आहेत. या सर्वांना मी वेळोवेळी मार्गदर्शन करतो. पिकांच्या लागवडीपासून पीक जगवन्यापर्यंतचे मार्गदर्शन मी करतो. विविध पद्धतींचा अवलंब करून शेतीत चांगले उत्पादन कसे मिळवता येईल हे सांगण्याकडे माझा कल आहे.

आमच्या सभासदांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांकडे फॉरेस्ट जमिनी आहेत. या शेतकऱ्यांना आंबे, बोर, सीताफळ, फणस अशी झाडे त्यांच्या जमिनीत लावायला प्रोत्साहन दिल्यास भविष्यात त्यांना त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहेत.

* कृषी पर्यटनवाढीसाठी सध्या काय उपक्रम वा प्रयत्न करीत आहात?

_ कृषी पर्यटन संकल्पनेत कृषी आणि पर्यटन अशा दोन भागांचा समन्वय दिसून येतो. या संकल्पनेत पर्यटक शेतांना भेट देतील. शेतीची विविध अंगे व पैलूचे दर्शन वा प्रत्यक्ष अनुभव घेतील. शहराकडच्या कोलाहलापासून काही क्षण घालवू शकतील. प्रदूषण मुक्त वातावरणात रमतील. ताजी फळे व भाजीपाला खरेदी करू शकतील.

शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणे गरजेचे आहे. निसर्गाचे वरदान असलेल्या नाशिक जिल्ह्याला कृषी पर्यटनात खूप मोठ्या संधी आहेत. भारतात कृषी पर्यटन ही संकल्पना चंद्रशेखर भडसावळे यांनी रुजवली. त्यांच्या कृषी पर्यटनाला मी दोनदा भेट दिली आहे. तेथील माहिती घेऊन आपल्याकडे कशाप्रकारे कृषी पर्यटनाचे वातावरण निर्माण करता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत.

प्रत्येक शेताचा एक वेगळा अनुभव असतो. कृषी पर्यटनासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेच; मात्र त्याला लोकांचीही साथ लाभली तर नाशिक जिल्ह्यातील कृषी पर्यटन एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचेल.

- शब्दांकन : अनिरुद्ध जोशी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com