Video Story : नाशिक शहरातील शेकडो समाज मंदिरं वापराविना पडून

Video Story : नाशिक शहरातील शेकडो समाज मंदिरं वापराविना पडून

नवीन नाशिक | निशिकांत पाटील

नवीन नाशिक परिसरात मनपाने कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले शेकडो समाज मंदिर व सभागृह वापराविना बंद अवस्थेत तर आहेतच मात्र जास्त पैसे मिळवायचे या विचारात मनपाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून मालमत्तेचे देखील नुकसान होत आहे...

नवीन नाशिक परिसरात मनपाच्या सुमारे 164 मालमत्ता खुले तसेच बंद स्वरूपात सभामंडप आहेत. त्यातील सुमारे 70 सभागृह खुल्या स्वरूपात असून इतर सभागृहे बंदिस्त आहेत. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात शहरासह नवीन नाशिक मधील मनपाच्या इमारतींना सिल लावण्यात आले.

त्यावेळी मनपाच्या इमारतींना मूल्यांकनानुसार अडीच टक्के भाडे आकारण्यात येत होते ,मात्र रेडीरेकनरच्या नियमानुसार ते भाडे अडीच टक्क्याहून आठ टक्के करण्यात आल्याने मनपाच्या इमारती सद्यपरिस्थितीत धूळखात पडून आहेत. 2019 - 2020 या आर्थिक वर्षात मनपाचे फक्त नवीन नाशिक परिसरातील उत्पन्न हे सुमारे 10 लाख 32 हजार 280 रुपये इतके होते.

मात्र सदर आठ टक्क्यांच्या नियमानुसार मनपाला उत्पन्न मिळवणे कठीण झाले आहे . 22 मार्चपासून देशभरात करोणा विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करण्यात आला होता. त्यावेळी इतरांसह मनपाचे देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले मात्र आता मनपातर्फे पुन्हा नव्याने आठ टक्‍क्‍यांनी परिसरातील मालमत्ता सामाजिक संस्थांनी वापरावयास घ्यावी असा आग्रह कायम आहे.

लॉक डाऊन उघडल्यानंतर जनजीवन सुरळीत करण्यासाठी खाजगी क्षेत्रात लोकांना विविध प्रकारच्या सवलती देऊन काम सुरू आहे ,जेणेकरून आर्थिक देवाण-घेवाण सुरू राहून सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल.

मनपातर्फे नवीन नाशिक या कामगार वसाहतीत समाज मंदिर किंवा सभागृह उभारण्याचा मुख्य उद्देश हा परिसरातील नागरिकांना अल्पदरात वाढदिवस, लग्नकार्य ,किंवा इतर कार्य करता यावे हा होता .खाजगी ठिकाणी घरातील कार्य करणे नवीन नाशिककरांना खूप कठीण जात होते त्या पार्श्वभूमीवर त्यावेळचे प्रशासकिय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संकल्पनेतून नवीन नाशिक परिसरात विविध प्रकल्प राबवले गेले व या समाज मंदिर किंवा सभागृह सांभाळण्याची जबाबदारी सामाजिक संस्थांना देण्यात आली होती.

त्यात व्यावसायिक दृष्टिकोन हा मुळात नव्हताच. मात्र मनपा सध्या व्यावसायिक दृष्टिकोनातून बघत असल्याने नागरिकांसह मनपाचे देखील यात लाखो रुपयांचे नुकसान तर होतच आहे त्यासोबतच वास्तूंचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

मनपाने याविषयाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघणे गरजेचे आहे. मनपाची मालमत्ता ही जनतेच्या वापरात यावी याकरिता प्रशासकीय यंत्रनेणें पुढाकार घेऊन त्याचा होणारा ऱ्हास टाळावा अशी नवीन नाशिक करांची अपेक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com