Video राज्यातील चर्चेतील जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड का म्हणाले, मी आदिवासी समाजाचा आहे, हीच चुक आहे का?

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे नागरिकांशी संवाद
Video राज्यातील चर्चेतील जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड का म्हणाले, मी आदिवासी समाजाचा आहे, हीच चुक आहे का?

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

माझे शिक्षण या जिल्हयात झाले, माझी जिल्हाधिकारी म्हणून या जिल्हयात नियुक्ती झाली त्यातच मी आदिवासी समाजाचा आहे हीच आपली चूक आहे का? असे आता वाटू लागले आहे. परंतू आपला आणि राजकारणाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, मी जिल्हावासीयांची सेवा करायला येथे आलो आहे, टर्म संपली की बदली होणार आहे, आणि कोणत्याही निवडणूकीला उभे राहणार नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केलेे.

नंदुरबार जिल्हयातील कोविडच्या परिस्थितीला तसेच रेमडिसिवीर इंजेक्शनच्या तुटवडयाला जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषद घेवून केला होता. याशिवाय फेबबुक लाईव्ह तसेच राष्ट्रीय वाहिन्यांवरही त्यांनी हा जाहीर आरोप केला होता. या आरोपाचे खंडण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी काल दि. ३ मे रोजी ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे जिल्हावासीयांशी संवाद साधला.

डॉ.भारुड म्हणाले, माझ्या प्रशासकीय सेवेला आठ वर्ष झाले. त्यामुळे प्रशासनात राहून जनतेची सेवा कशी करावी, याचे बारकावे माहित झाले आहेत. हा माझा डयुटीचा भाग आहे.

पण गेल्या महिन्याभरापासून काही कारण नसतांना उठसुठ पत्रकार परिषद घेणे, लाईव्ह करण्याचे काम सुरु आहे. एवढाच वेळ हॉस्पीटलला दिला असता तर? जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांना सर्वच अधिकार असतात.

कायद्यामध्ये कुठल्या व्यक्तीची सेवा कशाप्रकारे करावी याची माहिती आहे. परंतू जनसेवा करुनही माझे चुकले काय? माझा जन्म या जिल्हयात झाला. माझे शिक्षण याच जिल्हयात झाले आणि आता जिल्हाधिकारी म्हणून याच जिल्हयात सेवा देत आहे.

त्यामुळे मी आदिवासी समाजाचा आहे हीच माझी चुक आहे काय असे वाटू लागले आहे. कारण कुणीतरी अफवा पसरवली आहे की डॉ.भारुड हे निवडणुकीला उभे राहणार आहेत. मात्र, राजकारणाचा आणि आपला दूरदूरपर्यंत कुठलाही संबंध नाही.

मी जनतेची सेवा करण्यासाठी येथे आलो आहे आणि कालावधी संपला की येथून बदली होणार आहे. त्यामुळे राजकारणात येण्याचा प्रश्‍नच येत नाही.

डॉ.भारुड म्हणाले, रोटरी वेलनेस सेंटरला रेमडीसीवीर इंजेक्शन दिले तेव्हा ठिणगी पडल्याचे जाणवू लागले आहे. मी काही नियमबाहय काम केले असते तर त्यांनी शासनाकडे तक्रार करायला हवी होती.

मात्र, तसे झाले नाही. त्यांची शासन दखल घेत नाही, निती आयोग दखल घेत नाही, पीएमओ कार्यालय दखल घेत नाही म्हणून खालच्या स्तरावर जावून वारंवार अफवा पसरवण्याचे काम काही लोकांनी चालवले आहे. मात्र, जनता सर्व जाणते.

नंदुरबार जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. अशा परिस्थितीत रेमडेसिविर उपलब्ध होणे कठीण झाले होते. यामुळे शासनाच्या पत्रांन्वये तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार खासगी रुग्णालयात दाखल असणार्‍या रुग्णास अत्यावश्यक असेल तर ऊसनवार तत्वावर आपण रेमडेसिविर देवू शकतो.

त्यानुसार नंदुरबार येथील शासनाच्या परिपत्रकात नमूद असणार्‍या रोटरी वेलनेस या एकमेव परवानाधारक सेंटरला १ हजार इंजेक्शन ५९४ रुपये प्रमाणे देण्यात आले. याबाबत भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने प्राप्त यादीतील प्रत्येकाला संपर्क साधून उलट तपासणी केली असता रुग्णांना सदर इंजेक्शन संबंधित संस्थेकडून ५५० रुपयांना मिळाले असल्याचे समजले. यामुळे यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही.

जिल्ह्यात आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने वैद्यकीय पदवी असणार्‍या व सेवावृत्ती असल्यास जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख म्हणून त्यास रुग्णसेवा करण्यास परवानगी देण्याचे अधिकार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सुविधांची कमी असतांना कोरोना काळात मोठे आव्हान उभे राहिले होते. आरोग्य विभागातील २५ ते ३० टक्के रिक्त होती. अशा परिस्थितीवर मात करीत आपण यशस्वीरित्या कोरोनाविरोधात लढा देत आहोत.

यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रेल्वे आयसोलेशन आणणे विशेष नव्हते. त्यासाठी रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांना जिल्हा प्रशासनाकडून पत्रव्यवहार केला असल्याचे डॉ.भारुड यांनी सांगितले. मात्र कोणताही अधिकारी श्रेय घेण्यासाठी आलेला नसून सेवाभावी वृत्तीतून आम्ही काम करीत असल्याचे डॉ.भारुड म्हणाले.

जिल्ह्यात सात डायलिसीस यंत्र, नवीन ब्लड बॅँक, २७ ऍम्बुलन्स, दोन शववाहिका, स्वत:ची आरटीपीसीआर लॅब, दुर्गम भागापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा आदी गोष्टी केल्या असल्या तरी त्या जिल्ह्याच्या जनतेपर्यंत पोहचविणे अधिकार्‍याचे कर्तव्य आहे.

येत्या काळात जिल्ह्यात एक जम्बो हॉस्पिटल, दोन ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ.भारुड यांनी सांगितले. कोरोनाबाबतचे संभाव्य तिसरी लाट लक्षात घेवून आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

सद्यस्थितीत लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी मनातील द्वेष बाजूला ठेवून कोरोनाचे संकट लक्षात घेवून शक्य ती मदत करुन एकत्र यावे, लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुनही नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याने अशास्थितीत लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, हे सहकार्य लोकप्रतिनिधींकडून अपेक्षीत आहे, असेही ते म्हणाले.

वैद्यकीय सेवा देण्यास तयार असल्यास परवानगी देणार

आपत्तीजनक स्थितीत ज्या लोकांना वैद्यकीय सेवा द्यावयाची असल्यास त्याला कायद्याची कुठलीही अडचण येत नाही, त्यांनी माझ्याकडे अर्ज केल्यास कोणालाही वैद्यकीय सेवा देण्याची परवानगी आपण देवू शकतो, तेवढे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना असतात, असेही डॉ.भारुड यांनी स्पष्ट केले.

कुठलेही श्रेय घेण्यासाठी काम करत नाही

मी या जिल्हयात सेवा करण्यासाठी आलो आहोत, शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे काम करतो. आपत्ती व्यवस्थापनात मला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन वाटचाल करत आहे, यात कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी काम करत नाही, ते माझे कामच आहे, असेही डॉ.भारुड यांनी सांगितले.

माझी नियुक्ती झाली तेव्हा जिल्हाभरातून फोन आले केवळ एक परिवार सोडून, माझी दोन वर्षापुर्वी नंदुरबार जिल्हयात जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी मला जिल्हयाभरातून अनेक जणांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या, आनंद व्यक्त केला. मात्र, एकाच परिवाराने फोन केला नाही. त्यांना एक आदिवासी समाजातील युवक पुढे येत आहे, याचे कौतूक नसावे, असेही त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com