नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आज नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले....
पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे यावर ते म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, असे भुजबळ म्हणाले.
पाच तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का? अशी विचारणा झाली असता ते म्हणाले, याबाबत माहीत नाही. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) चालू आहे ती कशी सुटते ते बघू. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर मंत्रिमंडळाचा काय तो निर्णय होईल. पण आता दोनच मंत्री कॅबिनेटमध्ये आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तब्येत बरी नाही. रात्री 2 पर्यंत जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे त्याची परिसीमा आहे. थोडी विश्रांती घ्यावा लागते. दोनच मंत्री आहे आणि किती दौरे करणार?, असेही ते म्हणाले.
प्रभागरचनेबाबत भुजबळ म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाविकास आघाडीतच होते पण आता प्रभाग रचना (Ward Structure) का बदलले हे सांगता येणार नाही. जे उमेदवार असतात त्यांना वॉर्ड बदलला तर त्रास होतोच.
राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्याना मदत करा. 92 नगरपालिका, 4 नगरपंचायतीत ओबीसी आरक्षण लागू नाही. बांठीया कमिशनमध्ये ओबीसीची संख्या कमी दाखवली जात आहे, अनेक त्रुटी आहेत त्यासाठी लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.