<p>अहमदनगर (प्रतिनिधी)</p><p>केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात नगर जिल्हा हमाल पंचायतीने पाठिंबा देऊन या आंदोलनात सहभागी झाले. मार्केट यार्ड येथे रस्ता रोको, निदर्शने करुन सरकारच्या कृषी कायद्याचा निषेध करण्यात आला. </p><p>याप्रसंगी हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, सुधीर टोकेकर, सुभाष लांडे, बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख, विकास गेरंगे, रावसाहेब निमसे, गोविंद सांगळे, मधूकर केकाण, अशोक बाबर, विष्णूपंत म्हस्के, सतीश शेळके, नंदू डहाणे, शेख रज्जाक शेख आदि उपस्थित होते. याप्रसंगी घुले म्हणाले, दिल्ली येथे शेतकरी संघटनांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनास आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे हे शेतकर्यांच्या मुळावर उठणारे आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या दुबळ्या करण्याचे षङयंत्र आहे. त्याचप्रमाणे राज्यातील माथाडी कायदा कमकुवत करण्याचे कारस्थान केंद्रात शिजत असून, त्यामुळे माथाडी कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसाळणार आहे. केंद्र सरकार बाजार समित्या या कार्पोरेट कंपन्यांच्या हाती देण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांचे या कायद्याने मोठे नुकसान होणार असल्याने या कायद्याचा आमचा विरोध आहे. तो त्वरित मागे घ्यावा, अशीही मागणी यावेळी त्यांनी केले.</p><p>कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम करा, उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान हमी भावास कायदेशीर संरक्षण द्यावे, शेतकर्यांना आवश्यक तेथे सबसिडी उपलब्ध करुन द्यावी, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करुन राज्य सल्लागार मंडळ आणि जिल्हा माथाडी मंडळाचे तात्काळ गठन करावे, बाजार समिती क्षेत्रात माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत, याबाबत केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.</p>