Sunday, April 28, 2024
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘कोणीतरी येणार गं’

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘कोणीतरी येणार गं’

संदीप जाधव | 9225320946

महात्मा गांधीचा अहिंसावाद अन् जर्मनीचा हकूमशहा हिटलरने जनतेवर केलेला अनन्वित अत्याचार या दोन्ही परस्परविरोधी तत्त्वांमध्ये अहिंसावादाचा विजय होतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न करतानाच एक सामाजिक समस्या दर्शविणारी नाट्यकृती शनिवारी रंगमंचावर ‘कुणीतरी येणार गं’ या नाटकात सादर झाली.

- Advertisement -

या नाटकाने स्पर्धेचा समारोप झाला. विश्वकर्मा क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या या नाटकाच्या लेखनाची अन् दिग्दर्शनाची दुहेरी जबाबदारी अमित खताळ यांनी निभावली. नाटकात गर्भपात ही सामाजिक समस्या मांडताना स्वर्गलोकातील काल्पनिक कथानकाचा आधार घेण्यात आला.

पृथ्वीवरील असमतोलामुळे यमलोकातील कुणाला तरी जन्म घ्यावा लागेल, असा निर्णय अत्याधुनिक चित्रगुप्त घेतो. त्यासाठी महात्मा गांधी आणि जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडोल्फ हिटरल यांची निवड करतो. त्यांपैकी एकालाच पाठवायचे असते. त्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेमधून त्यांची विचारसरणी मांडण्याचा चांगला प्रयत्न दिग्दर्शकाने केला. त्यांच्या स्पर्धात्मक संवादाला पृथ्वीवरील प्रसंगाची संलग्नता देण्यात आली. या दोघांपैकी विजयी झालेला स्पर्धक पृथ्वीवरील रखमा या अविवाहीत तरुणीच्या पोटी जन्म घेणार असतो.

प्रेमाच्या मोहात अडकलेली रखमा ही निरागस बालिका प्रियकराकडून गर्भवती होते. तिचा गर्भपात करण्यासाठी तिला आत्याकडे म्हणजेच आक्काकडे आणले जाते. मात्र, तिचा गर्भपात टळतो. नीट बोलता येत नसलेला मुक्या हा आक्काचा मुलगा. त्याला रखमाच्या घुसमटीची जाणीव असते. हे दर्शविण्यासाठी विविध प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यासाठी प्रकाश व संगीत योजनेचा सुसंगत वापर करण्यात आला.

स्पर्धेत बापूजींच्या विचारांचा प्रभाव हिटरलवर पडायला सुरुवात होते. त्यांच्यात झडणार्‍या संवादाला पृथ्वीवरील रखमाच्या कथानकाची झालर असते. स्पर्धेत हिटलर विजयी होतो आणि त्याला पृथ्वीवर पाठवण्याचे ठरते. रखमाला सांभाळण्यासाठी मुक्या सरसावतो आणि तिचा स्वीकार करतो. अशा आशयाचे कथानक रंगविताना दिग्दर्शकाने अनेक प्रसंग चपलखपणे सादर करण्याचा प्रयत्न केला. त्याला कलाकारांची साभिनय साथ मिळाली. लेखक आणि दिग्दर्शक ही दोन्ही जबाबदारी पेलणारे अमित खताळ स्पर्धेतील एकमेव दिग्दर्शक. सामाजिक समस्येशी निगडित असणारा नाटकाचा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन भिन्न विचारसरणींचा वापर खताळ यांनी केला. विषयाची अवघड मांडणी मात्र काही प्रेक्षकांना उमगली नाही.
बापूंची भूमिका राहुल सुराणा यांनी केली. साजेशी अंगकाठी, विशिष्ट लकबीतील संथ संवाद आणि देहबोली यातून त्यांनी बापूंना रंगमंचावर आणले.

हिटरलची भूमिका हेमंत गवळे यांनी अगदी प्रभावीपणे साकारली. वेगवान शारीरिक हालचालींमुळे त्यांचा अभिनय खुलला. हिटरली आत्मविश्वासाने त्यांनी पात्राला उभे केले.
स्वप्नील मुनोत यांनी लॅपटॉप धारी चित्रगुप्तला यमलोकात आणले. त्यांच्या वाट्याला आलेले संवाद त्यांनी व्यवस्थित सादर केले. मात्र, यमलोकाचे डिजिटलायजेशन प्रेक्षकांना रूचले नाही.
रखमाला वैष्णवी घोडके यांनी निरागसपणे साकारले. त्यांच्या अभिनयात कमालीचा आत्मविश्वास जाणवला. प्रभावी संवादाला विविध हावभावांची छटा दाखविण्यात त्या यशस्वी झाल्या.
आक्का या पात्राची भूमिका प्रज्वला उर्फ राणी कासलीवाल यांनी उभे केले. प्रेमळ, जबाबदार आईला त्यांनी सादर केले. ही भूमिका त्यांनी अगदी सहजपणे केली.

मुक्या या पात्राला अथर्व धर्माधिकारी याने योग्य न्याय दिला. नाटकात त्याची भूमिका सर्वात जास्त प्रभावी ठरल्याचे दिसले. आपल्या गायीविषयी असणारे प्रेम व्यक्त करताना त्याचे हावभाव खूपच कमालीचे होते. त्याने चांगली तयारी केल्याचे दिसले. अनंत रिसे यांनी आबा या जबाबदार आणि हतबल पित्याची भूमिका केली. ग्रामीण भागातील पिता त्यांनी हुबेहूब दाखवून दिला.
विठ्ठल या प्रियकराची भूमिका विराज आवचितेने केली. छोटी असणारी भूमिका त्यांनी व्यवस्थित सांभाळली. मयूर गोडळकर व उत्कर्ष अंचवले हे टपोरी, गुंड प्रवृत्तीच्या अवतारात रंगमंचावर आले. छोटी भूमिका त्यांनी चांगली केली.

प्रकाश योजनेची जबाबदारी अमित रेखी यांच्याकडे होती. काही प्रसंगांत त्यांनी दिलेले लाईट छान वाटले. मात्र, एक-दोनदा पात्रांवर उशिराने लाईट आले. प्रसंगांत गांभीर्य आणण्यासाठी कारणीभूत ठरलेले संगीत सुदर्शन कुलकर्णी यांनी दिले. आपल्या जबाबदारीत ते कुठेही कमी पडले नाहीत. यमलोक, आक्काचे घर, विहीर आदींचे नेपथ्य अपूर्व मुळे व नानासाहेब मोरे यांनी साकारले. बोरीचं झाडही चांगल्या प्रकारे दाखविले. मंगेश गायकवाड यांनी रंगभूषा व वेशभूषा केली. बापूजी, हिटलर, निरागस रखमा, मुक्या यांना त्यांनी छान रंगवले. रंगमंच व्यवस्था पराग पाठक व उत्कर्ष आंचवले यांनी पाहिली. नाटकातील प्रसंग सादर करताना दिग्दर्शकाने कल्पकतेचे वापर केला. एका प्रसंगात आबा विंगेतून घरात येत असताना सर्वांना दिसला, तर रखमाची पाण्याची बाटली बराच वेळ तेथेच पडून होती. या काही चुका झाल्या. नाटकाचा शेवट सकारात्मक झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या