Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo Story : मालेगावी ४० तलवारी जप्त; तिघा संशयितांना पोलीस कोठडी

Video Story : मालेगावी ४० तलवारी जप्त; तिघा संशयितांना पोलीस कोठडी

मालेगाव | प्रतिनिधी

शहरात अवैधरित्या विक्रीसाठी रिक्षात लपवून आणल्या जात असलेल्‍या ४० धारदार तलवारींचा शस्त्रसाठा पोलिसांनी सापळा लावून शिताफीने जप्त केला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे…

- Advertisement -

व्हिडीओ स्टोरी : खंडू जगताप, प्रतिनिधी नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल मिड डे लगत ही कारवाई करण्यात आली. 6 डिसेंबर पूर्वी शहरात तलवारीचा साठा जप्त झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात अवैधरित्या विक्रीसाठी धारदार तलवारी आणल्या जाणार असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाल्याने त्यांनी विशेष पोलीस पथकास कारवाईचे निर्देश दिले होते

विशेष पथकाचे उपनिरीक्षक आर के घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी महामार्गावर सापळा लावला होता. सायंकाळच्या सुमारास संशयीत रिक्षावर नजर ठेवून असलेल्या पोलिसांना रिक्षा क्रमांक एम एच 41 ए टी, 0907 हॉटेल मीड डे जवळ येताच पोलिसांनी रिक्षा अडवली.

यावेळी एक संशयित उडी मारून पसार झाला. तर उर्वरित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रिक्षाची झडती घेतली असता त्यात ४० धारदार तलवारी पोलिसांना मिळून आल्या.

मोहम्मद आसिफ शब्बीर अहमद, अतिक अहमद सलीम अहमद, इमरान अहमद हबीब अहमद हे तिघे तलवारी विकणार होते. तर फरार झालेला मोहम्मद मेहमूद अब्दुल रशीद याने या तलवारी शहरात विक्रीसाठी आणल्या होत्या अशी माहिती आहे.

या कारवाईत चाळीस हजार रुपये किमतीच्या चाळीस तलवारी, 14 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल, 50 हजार रुपये किमतीची रिक्षा असा सुमारे एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पवारवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात आणला जात असलेला तलवारी अवैधरित्या विक्री केल्या जाणार होत्या तरीदेखील या तलवारी कुठून व कोणत्या उद्देशासाठी आणल्या गेल्या. याची कसून चौकशी पोलिसांतर्फे केली जात आहे. तलवार आणणारा मोहम्मद महेमुद हा फरार झाला असला तरी त्याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. लवकरच मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात येतील अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दैनिक देशदूत बोलताना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या