Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

# video # विविध मागण्यांसाठी राज्यातील चौदा अकृषी विदयापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयावर धडक

Share

पुणे, दि.२५  :  महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम ह्या तिघा महासंघांच्या निर्देशांवरून राज्यातील चौदा अकृषी विद्यापीठांमधील सुमारे दिड हजार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आज पुणे येथे मध्यवर्ती इमारतीत असलेल्या उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयावर धडक मारली.

राज्यातील चौदा अकृषी विद्यापीठांमधील व अशासकीय महाविद्यालयांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने गठित ‘राज्य वेतन सुधारणा समिती’च्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचना लागू केलेली नाही.

सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करण्यासह अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अन्य २६ मागण्यांच्या पूर्ततेसाठी, ह्या प्रलंबित प्रश्न वा मागण्यांच्या संदर्भात दीर्घ काळापासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय व उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून सतत होणारी उपेक्षा, मंत्री महोदयांना व माजी सनदी अधिकारी के.पी.बक्षी ह्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वेतन सुधारणा समितीला दिशाभूल करणारी माहिती देऊन उच्च शिक्षण संचालनालय व उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम ह्यांच्या निर्देशांवरून अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये दि.१० जून, २०१९ पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले.

ह्या आंदोलनाच्या आजच्या टप्प्यात राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या पुणे येथील मध्यवर्ती इमारतीतील कार्यालयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, मुंबई विद्यापीठ,मुंबई, श्रीमती ना. दा. ठा. महिला विद्यापीठ, मुंबई, आयसीटी, माटुंगा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांनी ‘धडक मोर्चा’ नेला. ह्या मोर्च्यामुळे पुणे विद्यापीठ ते मध्यवर्ती इमारती ह्या दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती.

‘वेतन त्रुटीरहित सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, शिक्षकेत्तर पदे भरतीसाठी मान्यता मिळालीच पाहिजे, तीस टक्के पदे कपातीचा निर्णय रद्द झालाच पाहिजे, समान सेवा प्रवेश नियम लागू झालेच पाहिजे’, अशा प्रकारच्या विविध सत्तर घोषणांनी पुणे विद्यापीठ ते संचालक कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

महासंघाच्या ह्या मोर्च्याचा शेवट पुण्यात मध्यवर्ती इमारतीच्या परिसरात उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयाजवळ झाला. त्यावेळी महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे, कार्याध्यक्ष अजय बळवंत देशमुख, महासचिव मिलिंद प्रभाकर भोसले, उपाध्यक्ष सर्वश्री कैलास सांडू पाथ्रीकर, यशवंत कृष्णाजी ब्रह्मे, सचिव डॉ.सुनील किसन धिवार, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ.नितीन अंबादास कोळी, ऑफिसर्स फोरमचे उपाध्यक्ष डॉ दीपक वसावे ह्यांची भाषणे झालीत.

त्यानंतर तिन्ही महासंघाच्या प्रतिनिधींनी उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज रघुराम माने ह्यांना महासंघाचे निवेदन दिले. त्यावेळी मुख्य प्रशासन अधिकारी हरिभाऊ शिंदे, विद्यापीठ शिक्षण कक्षाचे प्रशासन अधिकारी सुयश मधुकर दुसाने, अधीक्षक धीरज तावरे हेही उपस्थित होते.

विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न रास्त व जिव्हाळ्याचे असून त्याबाबत सकारात्मक शिफारस करून मी मंत्रालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठवितो व पाठपुरावा करेल, अशी ग्वाही संचालक डॉ.माने ह्यांनी ह्यावेळी महासंघाच्या प्रतिनिधींना दिले.

अकृषी विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या ह्या आंदोलनास राष्ट्रीय कामगार सेना, कास्ट्राईब, इंटक ह्या संघटनांनी पाठिंबा दिला असून त्याबाबतची निवेदने संबंधित संघटनांनी ह्यावेळी तिन्ही महासंघाना दिलीत.

महासंघाच्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात शनिवार, दि.२९ जून, २०१९ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप व त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास दि.१५ जुलै,२०१९ पासून विद्यापीठे बेमुदत बंद करण्याचा इशारा तिन्हीही महासंघांनी दिला आहे.

महासंघांच्या निर्देशांवरून सुरू असलेल्या आजच्या मोर्च्याच्या नियोजनाची पूर्वतयारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पुणे विद्यापीठ सेवक कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या विद्यापीठातील अन्य कर्मचारी संघटनांच्या मदतीने केली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!