Friday, April 26, 2024
Homeजळगाव12 वर्षीय पीडितेची साक्ष; आरोपीस सश्रम कारावास

12 वर्षीय पीडितेची साक्ष; आरोपीस सश्रम कारावास

जळगाव

धरणगाव तालुक्यातील विनयभंगाच्या एका खटल्यात 12 वर्षीय पीडित बालिकेच्या साक्षीच्या आधारे  जिल्हा न्यायालयाने आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा  मंगळवारी सुनावली आहे. याप्रकरणी एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

धरणगाव तालुक्यातील साकरे येथे 14 सप्टेंबर 2016 रोजी पीडित 12 वर्षीय अल्पवयीन बालिका घरात एकटी असताना ती शाळेत जाण्यासाठी घराचा दरवाजा बंद करीत होती. तेव्हा आरोपी आरीफ युसुफ खाटीक (वय 25, रा.साकरे) याने तिच्याकडे बाजारात जाण्यासाठी पिशवी मागितली.

ती पिशवी घेण्यासाठी पुन्हा घरात गेली असता आरोपी तिच्या मागे घरात गेला आणि त्याने तिचा विनयभंग केला होता. याबाबत धरणगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

त्यानुसार न्यायालयाने आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354, 452 व पोक्सो कायदयाचे कलम 7, 8 व 9 एम प्रमाणे दोषारोप निश्चित केला होता. सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

त्यात अल्पवयीन फिर्यादी व तपासाधिकारी वगळता सर्व साक्षीदार हे फितूर झाले होते. मात्र,12 वर्षे वयाच्या पीडित बालकेची साक्ष ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम 354 व पोक्सो कायद्याच्या कलमाप्रमाणे दोषी धरुन पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची तसेच भा.दं.वि. कलम 452 नुसार दोन वर्षे सश्रम कारावासाची व रुपये 500 दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सरकार पक्षातर्फे सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. तसेच आरोपीतर्फे अ‍ॅड.आर.जे. पाटील व अ‍ॅड. महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी शालिग्राम पाटील व तुषार मिस्तरी आणि केस वॉच पंकज पाटील यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या