नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा बळी; निफाड येथील रूग्ण दगावलाए चिंतेंत वाढ

0
नाशिक ।  स्वाईन फ्लूने जिल्ह्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महिनाभराच्या शांततेनंतर पुन्हा एक बळी स्वाईनफ्लूने घेतला आहे. हा या वर्षातील 36 बळी मानला जात आहे. तर तीघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कैलास गणत टाकळकर (36, रा. निफाड) असे मृत्यू झालेल्या रूग्णाचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूसदृश आजाराचे दोन रुग्ण 10 जुलै दरम्यान दाखल झाले होते. पैकी 36 वर्षीय टाकळकर यांचा उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. त्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

चालू वर्षात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 168 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात 36 पेक्षा अधिक रुग्णांचा बळी स्वाईन फ्लूने घेतला आहे. बळी गेलेल्यांमध्ये नाशिक शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने निफाड, सिन्नर, बागलाण, चांदवड, दिंंडोरी या तालुक्यांतील रुग्णांची संख्या अधिक आहे.

वर्षभरात जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, महापालिकेचे दवाखाने आदी ठिकाणी मिळून 54 हजार रुग्णांची स्वाईन फ्लूची चाचणी करण्यात आली आहे. पैकी 1 हजार 421 रुग्णांना टॅमी फ्लू गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगीतले.

जिल्ह्यामध्ये मागील महिनाभरापासून कमी होत जाऊन स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव पूर्ण बंद झाला होता. जिल्हा रूग्णालयात सुरू करण्यात आलेला स्वाईन फ्लू कक्षही काही दिवसांपासून बंद होता. मात्र मागील आठवड्यापासून पुन्हा स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे.

LEAVE A REPLY

*