आयसीएआय @71

आयसीएआय @71

प्रख्यात सीए चंद्रशेखर चितळे यांचा प्रासंगिक लेख

भारतात आर्थिक जमा-खर्च आणि हिशेब तपासणीसंबंधी नियमनाचे एकमुखी अधिकार भारतीय संसदेने ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंस् ऑफ इंडिया’कडे (आयसीएआय) सोपवले आहेत. नवी दिल्लीत मुख्यालय असलेली ही संंस्था आज, 1 जुलैस आपला 71 वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. त्यानिमित्त संस्थेचा परिचय....

‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंस् ऑफ इंडिया’ (आयसीएआय) आज (1 जुलै) आपला 71 वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. भारतात जमा-खर्च आणि हिशेब तपासणी या संबंधीचे अधिकार संसदेने कायदा करून या संस्थेस प्रदान केले आहेत. 1949 साली ‘चार्टर्ड अकाऊन्टंस् अ‍ॅक्ट’ संमत झाला आणि त्याच वर्षी 1 जुलैला ही संस्था प्रस्थापित आली.

आपल्या देशात आर्थिक जमा-खर्च आणि हिशेब तपासणी यासंबंधी नियमनाचे एकमुखी अधिकार संसदेने ‘आयसीएआय’कडे सोपवले आहेत. हिशेब पद्धतीसंबंधी मानक या संस्थेने विकसित केली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाणारी आयएफआरएस ही जमा-खर्चाची मानके इंड-ए.एस या स्वरुपात देशातील परिस्थितीस अनुरुप करून या संस्थेने विकसित केली आहेत.

हिशेब तपासणी करण्याच्या पद्धतीची मानकेदेखील विकसित केली आहेत. या मानकांमध्ये कालानुरुप सातत्याने बदल करून ती कायम अद्ययावत ठेवली जातात. आता ही मानके कंपनी कायद्यानुसार अनिवार्य केली आहेत.

चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.)

भारतात ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ ही सनद देण्याचा अधिकार केवळ ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया’ या संस्थेस आहे. ‘सीए’ सनद प्राप्त करण्यासाठीचा अभ्यासक्रम ही संस्था करते. ‘सीए’ सनद प्राप्तीसाठी ‘इंटरमिजिएट’ व ‘फायनल’ अशा दोन परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.

आज जगातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून या परीक्षांकडे पाहिले जाते. तसेच सीए होण्यासाठी एखाद्या व्यावसायिक चार्टर्ड अकाऊंटंटच्या कार्यालयात विद्यार्थ्यास तीन वर्षे आर्टिकलशिप करून प्रत्यक्ष कार्यानुभव प्राप्त करावा लागतो.

प्रवेश घेण्यासाठी सीएची फाऊंडेशन परीक्षा पास होणे किंवा प्राप्त करणे व इंटरमिजिएट परीक्षेचा एक भाग पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. शेवटचा वर्षभराचा कालावधी एखाद्या कंपनीतदेखील आर्टिकलशिप करता येते.

जागतिक मागणी

आज संस्थेचे सुमारे 3.00 लाख सदस्य आहेत. त्यापैकी 1.25 व्यवसायात व उर्वरित विविध क्षेत्रांत सेवांमध्ये कार्यरत आहेत. केवळ भारतातच नाही तर जगातील शेकडो देशांत ‘सीएं’ना मागणी आहे.

त्यामुळेच सीए अमेरिका, युरोप, आखाती देश, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी अनेक देशांत कार्यरत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये संस्थेची कार्यालये आहेत. जागतिक दर्जाची हिशेबाची मानके, प्रत्यक्ष कार्यानुभव, संगणक तंत्रज्ञानाचे अद्ययावत प्रशिक्षण आदी गुणधर्मामुळे ‘सीए’ना खूपच मागणी आहे. आज एकही ‘सीए’ बेकार नाही आणि जवळपास सर्व ‘सीए’ आयकर भरून देशसेवेत हातभार आहेत.

‘सीए’ झाल्यानंतर स्वत:चे कार्यालय थाटून अनेक जण व्यवसाय करतात. जमाखर्च ठेवणे, हिशेब तपासणी, आयकर सल्ला, वस्तू व सेवाकराचा सल्ला, परकीय चलन, कायद्याची माहिती, लघु-मध्यम औद्योगिक संस्थांची नोंदणी, संगणक प्रणाली विकसित करणे, त्याची अंमलबजावणी करणे, संस्थांना व्यवस्थापकीय सेवा पुरवणे, व्यावसायिक करार करण्यासाठी सल्ला, व्यवसाय सुरू करण्यास मदत, बँका, पतपुरवठा परकीय संस्थांकडून व्यवसायास पतपुरवठा करण्यात सल्ला व मदत.

कंपन्यांना भांडवल बाजारात समभाग विक्री या सल्ला व मदत, व्यवसायाशी निगडित रेरा, भागीदारी कायदा, कंपनी कायदा, व्यवसाय कर कायदा आदीसंबंधी सल्ला अशी अनेक प्रकारची सेवा सीए पुरवतात.

याखेरीज सहकारी संस्था, सोसायटी, धर्मदाय न्यास इत्यादी संस्थादेखील ‘सीएं’चा सल्ला घेत असतात. केंद्र व सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आदी सरकारी संस्थांना हिशेब ठेवणे, तपासणी व व्यवस्थापकीय सल्ला-सेवा सीए पुरवतात. ‘सीएं’ची अमर्याद कार्यकक्षा, बुद्धिमत्ता, व्यावसायिक अनुभव, सचोटी व प्रामाणिकपणा यामुळे व्यवसाय खूपच वाढत आहे.

त्यांना जगातील सर्व देशांकडून मागणी आहे. संगणक तंत्रज्ञानामुळे घरबसल्या व आपल्याला सोईचे असेल त्या वेळेस काम करता येण्याच्या उपलब्धतेमुळे अनेक ‘सीए’चा व्यवसाय करीत आहेत. या सर्व कारणांनी सुमारे 10 लाख विद्यार्थी ‘सीए’च्या अभ्यासक्रमाकडे आकर्षित झाले आहेत.

‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंस् ऑफ इंडिया’चा कारभार नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालय, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, कानपूर व चेन्नई येथील पाच प्रादेशिक कार्यालये आणि 164 शाखांमार्फत सांभाळला जातो.

परदेशातदेखील शाखा व कार्यालये आहेत. केंद्रस्थानी निवडून आलेले 32 केंद्रीय प्रतिनिधी व 8 सरकार नियुक्त प्रतिनिधी यांच्या केंद्रीय मंडळामार्फत संस्थेचा कारभार सांभाळला जातो. पुण्यातील चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रशेखर चितळे हे संस्थेच्या केंद्रीय मंडळावरील निर्वाचित प्रतिनिधी आहेत. प्रदेश व शाखांमध्येदेखील व्यवस्थापकीय समिती अनेक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करते.

‘करोना’ काळातदेखील संस्थेने शेकडो कार्यक्रम संगणकीय माध्यमातून घेतले. त्यात सीए व विद्यार्थी सहभागी झाले. हे कार्य आजही सुरूच आहे. अभिमानाची बाब म्हणजे पंतप्रधानांच्या ‘करोना निवारण निधी’साठी संस्थेने 21 कोटी रुपयांचे योगदान दिले. याखेरीज अनेक सीए वैयक्तिक पातळीवर वस्तू-सेवा-धन रुपाने मदत करीत आहेत. अशा देदीप्यमान ‘आयसीएआय’ संस्थेची ‘पंचाहत्तरी’कडे वाटचाल सुरू आहे.

(लेखक ‘आयसीएआय’च्या केंद्रीय मंडळावरील निर्वाचित प्रतिनिधी आहेत.)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com