Pro B N Chaudhari
Pro B N Chaudhari
विशेष लेख

शिक्षक, आई-सृजन यांचा सुरेख संगम : प्रा.बी.एन.चौधरी

Balvant Gaikwad

कार्यमुक्ती या शब्दप्रयोगात सेवानिवृत्ती हा शब्दप्रयोग रूढ झाला. शासन आदेशाचे दैनंदिन पालन करून निर्देशित वयाच्या सीमेपर्यंत, कार्यरत राहून, नंतर विश्रांत होणे म्हणजे कार्यमुक्त होणे. अर्थात सेवानिवृत्त होणे होय. ही सेवानिवृत्ती आनंद आणि विरह अशा संमिश्र स्वरूपाची असते. भूतकाळाचा एक मोठा पट अशा क्षणी निवृत्त होणार्‍याच्या डोळ्यांसमोर उभा ठाकतो. यातूनच आठवांच्या झडीसह आत्मचिंतनाचे अंकुर तरारून वर येऊ लागतात. अर्थात, ज्यांच्या ठायी नोकरीत असताना नेमून दिलेल्या कामाखेरीज काही वेगळं करण्याच्या उमेदी श्वासरुप होतात, अशा व्यक्ती समाजहितैशी म्हणून पंचक्रोशीत ओळखल्या जातात. त्यांची हीच ओळख भविष्यातल्या पिढ्यांचे भविष्य घडविण्यासाठी नक्कीच कामी येते. असेच एक कर्मयोगी आज सेवानिवृत्त होत आहेत, म्हणूनच प्रस्तुतचा लेखन प्रपंच.

प्रा.वा. ना. आंधळे ,मो. 9422767114

(मराठी विभाग) कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय,धरणगाव

माझे सन्मित्र प्रा.बी.एन.चौधरी हे दिनांक 30 जून 2020 रोजी धरणगाव येथील शतक महोत्सवी प. रा. हायस्कूल येथून 34 वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ अध्यापन कार्यसेवेसह वर्तमानी मुख्याध्यापक या पदावरून कार्यमुक्त होत आहेत. यानिमित्ताने एका समृद्ध कर्तव्य-ग्रंथाची उजळणी करण्याची संधी मला मिळाली. या घटनेचा मला मनस्वी आनंद होत आहे.

प्रा. चौधरी यांच्या जन्म कृषीनिष्ठा व समाजनिष्ठा जपणार्‍या तत्वनिष्ठ परिवारात दिनांक 23 जून 1962 रोजी झाला. बालपणात व अध्ययन काळात त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांना उच्चविद्याविभूषित होण्यास खरोखरीच कामी आले. विज्ञान विद्याशाखेमधून पदव्युत्तर होत ते शिक्षकांच्या नोकरीत आले. शिक्षक म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक ते सहपर्यायाने राष्ट्रीय जबाबदारीचा स्त्रोत. हाच विचार त्यांनी आपल्या संपूर्ण अध्यापन काळात जपला. त्यांनी नोकरीला तपाचे अधिष्ठान दिले, असे म्हटले तरी चालेल. प्रा. चौधरी यांच्या अध्यापन, अध्यापनेतर साधनेकडे पाहता त्यांची शिक्षक ते लोकशिक्षकही मुद्रा त्यांच्या सहवास परिघात येणार्‍या प्रत्येकाच्या मनी गडद होत गेलेली दिसून येते.

शिक्षक आयुष्यभर ज्ञान आणि धनसमृद्ध विद्यार्थ्यांची पिढीसह त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करतात. याचा वस्तुपाठ म्हणजेच प्रा. चौधरी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याची समप्रमाण सिद्धता म्हणजे त्यांच्या विद्यार्थी वृदांचे मानांकित गुणांनी शालांत परीक्षा सरशी करणे. शालेय तथा शालेयेतर क्षेत्रात नेत्रदीपक यशापर्यंत विद्यार्थ्यांचे सहजी जाणे. त्यांचे अनेक विद्यार्थी परदेशात उच्च पदावर नोकरी करत आहेत. विद्यार्थी वृंदाचे सार्वजनिक समारंभावेळी संस्कार व शिस्तीच्या बाबतीत होणारे दर्शन या सर्व गोष्टींच्या मुळाशी प्रा. चौधरींच्या आतील अतीव शिक्षकाने व मुख्याध्यापकाने घेतलेले श्रम, पराकाष्ठा असून ते विद्यार्थी वर्गाच्या संस्मरणात राहणारे आहेत. म्हणून शासकीय व सामाजिक पातळीवरून प्राध्यापक चौधरी यांना आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा गौरव म्हणजे ज्ञानदान व ज्ञानार्जनाला दिलेला उचित न्याय आहे, असे मला वाटते.

शिक्षक हा सर्वश्रुत असावा, असं म्हणतात. त्या अर्थाने प्रा. चौधरी हे उत्तम वाचक, सहिष्णू श्रोता आणि परखड वक्ता आहेत. आपल्या या गुणांचा त्यांच्या दैनंदिन अध्यापनात प्रभाव पडला नसता, तर ते नवल ठरले असते. आपली ही कला विद्यार्थ्यांत रुजावी, म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत त्याचे धडे गिरवले. म्हणून त्यांचे अनेक विद्यार्थी हे उत्तम, फर्डे वक्ते झाले.

शिक्षक, आई आणि सृजन या तिन्ही घटकांना मानवी आयुष्यात अतुलनीय आणि असामान्य स्थान आहे. हे तिन्ही घटक एका जागी एका व्यक्तीत उतरणे हे अद्वितीय असून अनाकलनीयही आहे. प्रा. बी. एन. चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वात या तिन्ही घटकांचे असलेल्या अस्तित्वामुळेच यशाच्या उंच कमानी पंचक्रोशीच्या समाज मनाभोवती त्यांना उभारत्या आल्यात. विज्ञानाचे शिक्षक म्हणून अध्यापनातून प्रात्यक्षिक प्रदर्शनापर्यंत जाणारी त्यांची दृष्टी व त्यासोबतच पदव्युत्तर कला साधनेतून त्यांना लाभलेली दिव्य सृजनशक्ती यांची सुंदर वीण त्यांनी आपल्या आजवरच्या आयुष्य वाटचालीत साधली आहे. आपली साहित्य सेवा निर्दोष आणि समृध्द व्हावी म्हणून त्यांनी सेवेत असताना मराठीतून एम. ए. केले. सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखनाची त्यांना उपजत देणगी लाभली आहे. त्यांच्या लेखन कलेचे, अक्षरांचे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई यांनी तोंडभरून कौतुक केले तसेच त्यांच्या व्यंगचित्रकलेचे हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक पुरस्कार देऊन सन्मान केला तर सलग पाच वर्षे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन त्यांनी जिल्ह्यात एक नवा विक्रम नोंदविला आहे. यासह त्यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्रात प्रथम येऊन आपल्या शाळेची व जिल्ह्याची यशोपताका फडकविली आहे. खासगी व सामाजिक जीवनात त्यांनी आपल्या तत्त्वनिष्ठा कायम ठेवून त्याची सरमिसळ कधीही होऊ दिली नाही. स्पष्टोक्ती हा अलंकार म्हणून त्यांनी आपल्या कंठात धारण केला. सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे, हा त्यांचा स्थायीभाव, म्हणून प्रशासनात त्यांनी काही प्रसंगी कठोरतेतून कटुता ही आनंदाने स्वीकारली. प्रशासक म्हणून मुख्याध्यापकपदी विराजमान झाल्यावर सन्माननीय संचालकांनी तसेच पालकांनी प्राध्यापक चौधरी यांना शालेय व्यवस्थानात मुक्तहस्त दिला. त्याचा सदुपयोग करत त्यांनी अनेक लक्षवेधी उपक्रम राबविले. दोन वर्षात त्यांनी शाळा बोलकी केली. त्यांच्या या कार्यकाळाचे संस्थाचालक, शिक्षक आणि पालक यांनी वेळोवेळी भरभरून कौतुक केले. या निवृत्तीच्या क्षणी या सार्‍या आठवांची आळवणी त्यांच्या अंतरी होणे स्वाभाविक आहे.

शिक्षक हा चतुर्भुज असावा, हा विचार त्यांनी स्वतः जपला व इतरांनी अनुनय करावा, यासाठी त्यांनी प्रतिष्ठित प्रयत्न केलेत. शिस्त हा त्यांचा आवडता गुण. शिस्त विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आलीच पाहिजे, असा त्यांचा हट्ट. म्हणून त्यासाठी त्यांनी आपल्या मुख्याध्यापक पदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात संपूर्ण शाळेचेच चित्र बदलून टाकले. त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात आणले. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण झाली व शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची लालसा निर्माण झाली. शिक्षक हा चतुर्भुज असावा, असं म्हणतात. चतुर्भुज म्हणजे काय? तर चतुर्भुज म्हणजे लेखन, वाचन, चिंतन आणि भाषण या चारभूजा. त्या ज्या शिक्षकात असतात, तो शिक्षक विद्यार्थीप्रिय व पर्यायाने समाजप्रिय समजला जातो. समाजप्रिय शिक्षकाची ही परंपरा या देशात, या मातीत पूर्वापार रुजलेली आहेच. वर्तमानी या परंपरेचा लौकिक वाढविण्याच्या दृष्टीने प्रा. चौधरी यांनी केलेले काम, घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. लेखनातून रंजन व प्रबोधन या दोन्ही वाटा समृद्ध करीत त्यांनी साहित्य लेखनही केले आहे. याला जीवन ऐसे नाव हा ई- बुक संग्रह तर उद्ध्वस्त हा कथासंग्रह, बंधमुक्त हा काव्यसंग्रह आणि काव्यगंध हा समीक्षा संग्रह त्यांच्या नावावर आहेत. तसेच प्रौढ साक्षरतेचे संदर्भातील पाच कथा पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. विज्ञानाचे शिक्षक असूनही ही लेखन संपदा त्यांना साकारता आली, यातच त्यांचे वेगळेपण दडलेले आहे.

वृत्तपत्रीय साहित्य पुरवण्यांपासून निखळ वाङ्मयीन मासिकं, दिवाळी अंकात त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. आकाशवाणीसारख्या व्यासपीठापासून दूरदर्शनच्या विविध चॅनलपर्यंत त्यांची लेखणी आणि वाणी वाचनीय व श्रवणीय झाली व समाजहिताकरिता कामी आली. याविषयीची समाजधुरिणांनी व सृजनश्रेष्ठी यांनी वेळोवेळी कृतज्ञताही नोंदवली आहे. प्रा. चौधरी यांच्यातल्या शिक्षकाला कवीला आणि व्यंगचित्रकाराला उभ्या खान्देशसह महाराष्ट्राने आजमितीपर्यंत एकोणवीस पुरस्कारांनी यथोचित गौरव केला आहे. याखेरीज प्रा. चौधरींच्या कार्यकर्तृत्व गंधाचा दरवळ आपल्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांचेपावेतो पोहोचल्याने या सर्व महानुभवांनी सन्मानपत्र शुभेच्छापत्र पाठवून प्रा. चौधरी यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना बळ दिले आहे. राजकीय क्षेत्राप्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कितीतरी मान्यवरांनी त्यांच्या लेखन कौशल्याचे स्वागत करीत कौतुक केले आहे. किशोर, जीवन शिक्षण, लर्न मोअर, शिक्षण संक्रमण आणि भारतीय शिक्षण यासारख्या शैक्षणिक नियतकालिकेतून प्रा. चौधरींचे लेखन सातत्याने प्रसिद्ध झाले आहे. विद्वान संपादकांनी वेळोवेळी त्यांच्या लेखनाची निवड करुन सतत त्यांच्यातल्या कवित्वाला व शिक्षकाला मिळालेली मानवंदनाच म्हटली पाहिजे.

आपल्या या संपूर्ण यशाचे श्रेय ते आपले आई आणि वडील यांना देतात. अल्पशिक्षित असूनही त्यांनी आपल्या शिक्षणासाठी जे कष्ट घेतले, त्यातूनच आपल्याला शिक्षक होण्याची प्रेरणा मिळाली, असे ते अभिमानाने सांगतात. ज्या शाळेत बालवाडीत प्रवेश घेतला, त्याच शाळेतील मुख्याध्यापक पदावरून निवृत्त होताना आपल्याला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते, अशी प्रतिक्रिया प्रा. चौधरी या निमित्ताने व्यक्त करतात. असा सन्मान मिळवणारे ते प. रा विद्यालयातील एकमात्र विद्यार्थी आहेत. अशा या बहुआयामी सन्मित्राच्या सेवानिवृत्ती क्षणी त्यांच्या निवृत्तीनंतरच्या भविष्यकाळासाठी व सर्वोत्तम सृजनसेवेसाठी मी प्रार्थना करतो. परमेश्वर त्यांना दीर्घायुरोग्य देवो, अशी शुभेच्छा व्यक्त करतो.

Deshdoot
www.deshdoot.com