खूशखबर : पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही

0
नवी दिल्‍ली : वाहतूक नियमांचे उल्‍लंघन झाल्यानंतर पोलिसांनी ड्रायव्‍हिंग लायसन्‍स काढून घेतल्याचा प्रकार अनेकांनी अनुभवला असेल. पोलिसांनी आपल्याला पकडल्यानंतर वाहतूक परवाना, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र आणि विम्याबाबत कागदपत्रांची मागणी केली असेल. अशा प्रकरणांत नाईलाजाने दंड भरून आपली सुटका करवून घेतल्याचा अनुभवही काहींना असेल. परंतु आपल्यासाठी एक खूशखबर आहे. आता वाहतूक पोलिसांना तुमचा कोणताही परवाना जप्‍त करता येणार नाही. तसे निर्देश नव्या नियमावलीत परिवहन मंत्रालयानेच दिले आहेत. 

 

परिवहन मंत्रालयाने नव्या आयटी कायद्याच्या आधारे याबाबत निर्देश जारी केले आहेत. वाहतूक पोलिस आणि राज्य परिवहन विभागाला कोणतीही मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी घेऊ नयेत असे निर्देश नव्या नियमावलीत दिले आहेत. त्यासाठी डिजिलॉकर किंवा एम परिवहनसारख्या ॲपवर उपलब्ध कागदपत्रांच्या प्रती ग्राह्य धरण्यात येणार आहेत. वाहनाच्या नंबरवरून पोलीस त्यांच्या मोबाईलवरील अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा पोलीस आणि वाहन चालक या दोघांनाही होणार आहे.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि मोटार वाहन कायदा 1988 मध्ये हे बदल करण्यात आले आहेत. डिजिटल डॉक्युमेंट वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वीकारली जात नसल्याच्या बऱ्याच तक्रारी परिवाहन मंत्रालयाकडे माहिती अधिकारामार्फत करण्यात आल्या होत्या. सध्या सर्व मोबाईलमध्ये डिजिलॉकर उपलब्ध आहे. परंतु एम परिवहन हे ॲप केवळ ॲन्‍ड्रॉईड फोनमध्ये उपलब्ध आहे.  काही दिवसात हे ॲपलच्या आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*