वाढलेल्या ग्राहकांमुळे भाजीपाला विक्रेत्यांची चांदी

बुधवार बाजारात खरेदीला गर्दी

0
नाशिक | दि. ७ प्रतिनिधी- शेतकरी संपामुळे आठ दिवसांपासून भाजीपाला मिळत नव्हता. बुधवार बाजारात कोबी,फ्लॉवर, वांगी, भोपळा, टोमॅटो, कारली आदी फळभाज्यांसह कोथिंबिर, मेथी, शेपू, पालक आदी भाज्यांची आवक अधिक झाल्याने, भाजीपाल्याच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांनी बाजारातून सर्वाधिक खरेदी केली. त्यामूळे बुधवार बाजारात ग्राहकांची अलोट गर्दी होती.

विक्रेत्यांची संख्या अधिक
दूपारी पाऊस कोसळत असतानाही बुधवार बाजारात ग्राहकांनी भाजीपाला खरेदीला प्राधान्य दिले. त्यामूळे विके्रत्यांना पुन्हा माल विक्रीला आणावा लागला. बुधवार बाजारात विके्रत्यांसह नाशिक, त्र्यंबक, निफाड तालुक्यातील काही शेतकर्‍यांही भाजीपाला विक्रीला आणला होता. त्यामूळे त्यांच्याकडेही खरेदीसाठी ग्राहकांची रिघ होती. भाजीपाल्याचे दर सुरवातीला तेजीत होते. मात्र, आवक वाढल्यानंतर दरामध्ये किंचित घट झाली होती. शहरातील इतर भाजीबाजारात ग्राहकांना भाजीपाला, फळभाज्या मिळत नव्हत्या, त्यामूूळे आज मध्यमवर्गीय ग्राहकांनीही बुधबार बाजार गाठून आठवड्यासाठी भाजीपाल्याची खरेदी करून घेतली. त्यामूळे शहरातील आठवडे बाजारात ग्रामीण खरेदीदारासह शहरातील

ग्राहकांची संख्या वाढलेली होती.
बुधवार बाजारात एरवी गौरीपटांगण, दहीपूल आणि गणेशवाडीकडे जाणार्‍या मार्गावरच भाजीपाला विके्रते पाल टाकतात. मात्र आज बाजारात भाजीपाल्याची विक्री अधिक करण्यासाठी ताळकुठेश्‍वर मंदिर परिसर, सांडव्यावरची देवी मंदिर समोर रस्ता, सरदार चौक, साईबाबा मंदिर, भाजी मंडई, दहीपूल आदी भागात भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी झालेली होती. शेतकर्‍यांनी वाहनाच माल विक्री सुरु केली होती तर, किरकोळ विक्रेत्यांनी छोटे दूकाने लावून माल विक्री केला.

शहरात असल्याने बाजार सुरु
जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या आठवडे बाजारांना संपकरी शेतकर्‍यांनी बंद ठेवण्याचे आवाहन केलेले होते. त्यामूळे प्रत्येक दिवसांचे नियोजन करून आठवडे बाजारात शेतमाल घेऊन विक्री करणार्‍या छोठ्या व्यापार्‍यांची पंचायत झालेली होती. तसेच ग्राहकांनाही शेतमाल उपलब्ध होत नव्हता. पण बुधवारचा बाजार नाशिक शहरामध्ये भरतो. मध्यवस्तीत हे ठिकाण असल्याने आणि बाजार मोठ्या प्रमाणात भर असल्याने शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना आणि किेरकोळ विक्रेत्यांना आज या ठिकाणी दूकाने लावण्यासाठी गर्दी केली होती.

बाजारातील दर
बुधवार बाजारात सकाळच्या दरम्यान ग्राहकांना चढ्या दराने भाजीपाला, फळभाज्या खरेदी करावा लागत होता. तर दूपारी दर कमी झाले होते. मात्र संध्याकाळी गर्दी वाढली होती तर दरही किंचित घसरले होते. बुधवार बाजारात कोबीचा एक नग दहा ते १५ रुपये दराने विक्री होत होता.

टोमॅटो ४० ते ५० रुपये किलो, वांगी ६० रुपये, गवार ६० रुपये, ढोबळी मिरची ८० रुपये , लिंबू २ रुपये नग, फ्लॉवर १५ ते २० रुपये नग, कांदा १० रुपये किलो, मेथी ३० रुपये जुडी, शेपू २० रुपये, कोथिंबिर ७० ते ८० रुपये जुडी, कारले ६० रुपये, भोपळा १० रुपये नग या दराने किरकोळ विक्री सुरु होती.

LEAVE A REPLY

*