भाजीपाल्यावर तेजीची टवटवी

0

नाशिक । (सोमनाथ ताकवाले) | शेपू, मेथी, कांदापात, कोथिंबीर, पालक, पुदीना आणि चाकवत आदी भालेभाल्याची भाजीबाजारात घटलेली आवक, ग्राहकांना आणि विक्रेत्यांना सतावून सोडत आहे.

गत पंधरा दिवसांपासून पालेभाज्यांची आवक मंदावल्याने मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामूळे कोथिंबीर प्रतिजुडी 60 ते 180 रुपये , मेथी 40 ते 60 रुपये ,शेपू 20 ते 35 रुपये आणि कांदापात सरासरी 20 रुपये जुडीने लिलावात विक्री होत आहे.

त्यामूळे सामान्य ग्राहकांना पालेभाज्याची खरेदी चढ्या दराने करावी लागत आहे. भाजीपाल्यावर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने तेजीची टवटवी आली आहे.

गत महिन्यात लावण्यात आलेल्या पालेभाज्यांची आवक अद्याप आलेली नाही. त्याचबरोबर जो भाजीपाला उन्हाळ्यात लावण्यात आला होता त्याची शेवटची खुडणी होत आलेली आहे. नवीन पालेभाज्याची आवक अत्यल्प असल्याने भाजीपाल्याची बाजार समितीत आवक घटलेली आहे.

शेतकरी संपा दरम्यान अगोदर भाजीपाल्याची मागणी प्रचंड होती संप मिटल्यानंतर नाशिकच्या स्थानिक बाजारपेठेसह मुंबई,गुजरात या परपेठेतील बाजारपेठेत भाजीपाल्याला प्रचंड मागणी वाढलेली होती. नेमके हीच बाब शेतकर्‍यांच्या हिताची ठरली आहे.

काल नाशिकमध्ये सर्वाधिक दराने भाजीपाला विक्री झाल्याचे तुळजा भवानी व्हीजिटेबल कंपनीचे राजू अंधाळे यांनी माहिती देताना सांगितले की, कोथिंबिर सुमारे 18 हजार 400 रुपये शेकड्यांने विक्री झाली. मेथी सहा ते सात हजार रुपये शेकडा, शेपू 25 ते 35 रुपये जुडी आणि कांदपात 5 हजार ते सहा हजार रुपये शेकडा दराने लिलावात घाऊक स्वरूपात विक्री झाली.
बाजार आवारातच पालेभाज्याचे दर गगणाला भिडलेले असल्याने किरकोळ भाजीबाजारात दरांची काय स्थिती असेल, याची विचारणा जेव्हा विक्रेत्यांना केली तेव्हा विक्रेत्यांचे म्हणणेही होते की, कोथिंबिरीच्या दोन काड्या 10 रुपयांना विक्री कराव्या लागत आहे.

तर मेथीची जुडी जादा दर असूनही ग्राहका खरेदी करण्याच्या तयारीत असतात पण, त्यांना ही भाजी उपलब्ध करून देऊ शकत नाही. कारण, मेथीची आवक फक्त एक दीड हजार जुडीच लिलावात होत आहे. त्यामूळे या जुड्या स्थानिक बाजारपेठेत पुरवाव्यात की, परपेठेत पाठव्याव्यात, असा प्रश्न व्यापार्‍यांना पडतो.

भाजीपाला ऐन पावसाळ्यात कडाडण्याचे कारण म्हणजे , यंदा शेतकर्‍यांनी संपूर्ण उन्हाळ्यात शिवारांमध्ये पाण्याची उपलब्धता असल्यामूळे निरनिराळ्या पालेभाज्यांचे पिक घेऊन तो बाजारसमित्यात विक्रीला आणलेला होता. या कालावधी भाजीपाल्यांचे दर प्रचंड घसरलेले होते.

कमी दराने भाजीपाला विक्री सुमारे सहा महिन्यापासून सुरु होती. कोणताही भाजीपाला 20 रुपयांच्या आत ग्राहकांना खरेदी करता येईल, अशी स्थिती भाजीबाजारात दरांची होती. पाण्यामुळे भर उन्हाळ्यात भाजीपाला घेणार्‍या शेतकर्‍यांंनी खरीप हंगामातही पालेभाज्या घेण्यासाठी मे महिन्याच्या शेवटी सुरवात केलेली होती. त्यामूळे लागवड झालेली मेथी, कोथिंबिर, कांदापात आणि शेपू या भाज्या आता जोमात येण्याच्या स्थितीत आहे. त्यामूळे त्यांची आवक पुढील महिन्याच्या सुरुवातीला मार्केट मध्ये होऊन दरांमध्ये काही प्रमाणात घसरण होण्याची स्थिती आहे.

सध्या छाणी प्रकारच्या जाड काडीची कोथिंबिरही तीन ते दहा हजार रुपये शेकड्याने विक्री होत आहे. गावठी कोथिंबिर या दराच्या दुप्पट किमतीने विक्री होत आहे. मात्र, विक्रीला आणणार्‍या शेतकर्‍यांकडे गावठी कोथिंबिर अत्यल्प आहे. त्यामूळे जादा दर असूनही त्याचा लाभ काही शेतकर्‍यांनाच होत आहे.

मेथीची आवक संपूर्ण बाजार आवारात 5 ते 6 हजार जुडी होत आहे. मुंबई, गुजरातसह या जुड्या नाशिकच्या बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी पुर्ण करू शकत नसल्याने दरामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. मेथीची जुडी एरवी 10 ते 15 रुपयांना विक्री होते.

मात्र सध्या मेथीच्या एका जुडीला सुमारे 50 ते 70 रुपये भाव आहे. तर शेपू 20 ते 35 रुपये जुडी आहे. कांद्याची पात आणि तादूळका या पालेभाज्यांना कधी किमत मिळत नव्हती, त्या भाज्याही सध्या मार्केटमध्ये 30 ते 35 रुपये जुडीने विक्री होत आहे. दोन, तीन रुपयांना मिळणारी पालकाची भाजी सध्या आठ ते दहा रुपयांना विक्री होत आहे. पुदीना तीन ते पाच रुपये जुडी दराने विक्री हेात आहे.

LEAVE A REPLY

*