हॉटेलमधून भाजीपाला गायब

0
नाशिक | दि. ४ प्रतिनिधी- शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी तीव्र स्वरुपाचे परिणाम जाणवायला लागले असून, शहरातील हॉटेलमधून भाजीपाला गायब झाला आहे. सामान्य नागरिकांच्या आहारातही मागील तीन दिवसांपासून डाळी दिसू लागल्या आहेत.
शेतकरी संप सुरूच राहणार असल्याने संपाच्या झळा येणार्‍या काळात अधिक तीव्र होणार आहेत.
शेतकरी संप अद्यापही मिटलेला नसून, जागोजागी भाजीपाल्याच्या, दुधाच्या गाड्या अडवून शेतकर्‍यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.

काही ठिकाणी कृषीमाल रस्त्यावर फेकून देत आंदोलन अद्यापही सुरू आहे. चार दिवस उलटूनही बाजार नसल्यामुळे शहरातील हॉटेलमालकांचे धाबे दणाणले आहे. शहरातील हॉटेलमधून सर्व प्रकारच्या भाज्या गायब झाल्या आहेत. शिवाय मुंबईतील मोठमोठ्या थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलमधूनही भाजीपाल्याच्या ऑर्डर्स येत असल्या तरी कृषीमालच नसल्याने व्यापार्‍यांचेही हात रिकामेच आहेत.

त्यामुळे राज्यातील संपाचा परिणाम आता जनसामान्यांवर होत आहे. दुधाचे दर ७५ रुपयांपर्यंत गेले असून, शिल्लक भाजीपाल्याचे भावही वधारले आहेत. काही ठिकाणी आधीच स्टोअर केलेला भाजीपाला चढया दराने विकला जात आहे. नाशिक शहर परिसरात १ हजार २०० हून अधिक लहान मोठ्या हॉटेलमध्ये होणारा भाजीपाला, फळपुरवठा थांबला असल्याने त्याचा परिणाम हॉटेलव्यावसायिकांवर होतांना दिसत आहे.

संपाचा फटका त्यांच्या व्यवसायालादेखील बसला आहे. केवळ बटाटा, कांदा शिल्लक असल्याने ग्राहकांची लिमिटेड ऑर्डर घेतली जात आहे. तीन दिवसांपूर्वी आधीच खरेदी करू फ्रिजमध्ये स्टोअर केलेला भाजीपाला संपल्याने नव्या भाजीपाल्यासाठी हॉटेलचालक व्यावसायिकांना, तर कधी थेट शेतकरयांना गळ घालताना दिसत आहे.

चांगले पैसे मिळतील परंतु वाहनांचे नुकसान होईल, घात अपघात होईल यामुळे वाहनचालकही कृषीमाल बाहेर नेण्यास तयार होत नाहीत. सामान्य नागरिकंानाही संपाची झळ बसू लागल्याने त्यांनीही आहारात अंडी, बटाटा, डाळींचा समावेश केला आहे.

हमालांचाही रोजगार ठप्प
जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात कार्यरत हमालांचा रोजगार ठप्प झाला आहे. कृषी मालच येत नसल्याने रोज माल उतरविणे, चढविणे, मोजणे अशी कामेच होत नसल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

LEAVE A REPLY

*