Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

वरुडी फाटा येथे चोरट्यांनी फोडली सात दुकाने

Share

घारगाव (वार्ताहर) – संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरुडी फाटा येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री सात दुकाने फोडली. ही घटना शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रात्री घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

वरुडी फाटा येथील सोपान जानकु घुले यांच्या मालकीचे गोविंद कलेक्शन, विठ्ठल नानाभाऊ बोंबले यांचे विठ्ठल किराणा गोडावून, राजश्री बाळासाहेब अनासरे या महिलेचे श्रावणी ब्युटी पार्लर, सोमनाथ रामचंद्र भागवत यांचे मातोश्री कृषी सेवा केंद्र, संदीप भास्कर भागवत यांचे श्री स्वामी समर्थ अ‍ॅग्रो सर्व्हीसेस अ‍ॅण्ड इलेक्ट्रीकल्स, वैभव बाळासाहेब फटांगरे यांचे प्रशांत मोबाईल शॉपी व अमिन मोहम्मद शेख यांचे अमेरिया मेडीकल अशी सात दुकाने या ठिकाणी आहेत.

शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे वरील सर्व जणांनी आपआपली दुकाने बंद करुन घरी निघून गेले होते. शनिवारी रात्री सात ते रविवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी सात दुकानांचे शटर उचकाटून दुकानांमध्ये प्रवेश केला. सामानांची उचकापाचक करुन चोरट्यांनी एक हजार रुपयांची चिल्लर, अ‍ॅन्ड्रॉईड टॅब असा एकूण सहा हजार रुपयांचा ऐवज चोरुन चोरटयांनी पोबारा केला आहे. रविवारी सकाळी स्थानिकांना दुकानाचे शटर उचकाटलेल्या अवस्थेत दिसले.

त्यामुळे चोरी झाली असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. सोपान घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल आदिनाथ गांधले करत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!